कणकवली नगरपंचायतीवर झेंडा कुणाचा?

राजेश सरकारे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कणकवली नगरपंचायत स्थापनेनंतरची चौथी सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होईल. नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजप आणि शिवसेना या तीन पक्षांचा सत्ता मिळविण्यासाठी प्रामुख्याने कस लागेल. गावआघाडी निवडणुकीत उतरली, तर त्याची झळ राजकीय पक्षांना काही प्रमाणात बसणार आहे. कणकवली नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत संदेश पारकरांनी सत्ता मिळविली. दुसऱ्या निवडणुकीत राणेंच्या शिलेदारांची बाजी मारली. तर तिसऱ्या निवडणुकीत पारकर आणि राणेंनी एकत्रित येऊन विजय संपादन केला. आता चौथ्या निवडणुकीत नगरपंचायतीवर कुठला पक्ष झेंडा फडकवणार याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह शहरवासीयांना आहे.

प्रशासकीय कारभाराची सुरवात
गड आणि जानवली नद्यांच्या काठावरील कणकवली शहरात ४ डिसेंबर १९४२ ला ग्रामपंचायतीची स्थापना झाली. तत्पूर्वी १९३५ ते १९३९ या दरम्यान गड आणि जानवली नद्यांवर पुलांची बांधणी झाली आणि कणकवली शहराचा विस्तार वाढू लागला. १९४३ पर्यंत शहरात नवीन बाजारपेठ उभी राहिली, तर १९४५ मध्ये कणकवलीला तहसीलची स्थापना झाल्यानंतर शहराचे महत्त्व आणखी वाढले.

कणकवली नगरपंचायतीची स्थापना २००२ मध्ये झाली. तत्पूर्वीच्या ग्रामपंचायतीचा कारभार जगन्नाथ वळंजू, पुरुषोत्तम ताशयेटे, पुतळोजी राणे, रघुनाथ पारकर, मनोहर आळवे, वसंत पारकर, भाई बेळेकर, सुरेश माणगावकर यांनी सांभाळला. या सर्वांनीच कणकवली सरपंचपदाला न्याय देताना शहराच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले. हीच परंपरा युवा नेते संदेश पारकर यांनी १९९२ ते २००२ पर्यंतच्या सरपंच काळात पार पाडली.

नगरपंचायतीचे स्वरूप
२००३ मध्ये कणकवली नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. यात कणकवलीचे किंगमेकर संदेश पारकर यांनी एकहाती सत्ता मिळविली. कणकवलीचे पहिले नगराध्यक्ष म्हणूनही ते थेट जनतेमधून निवडून आले. २००८ च्या निवडणुकीत; मात्र नारायण राणेंच्या शिलेदारांनी पारकरांची मक्तेदारी मोडीत काढली आणि नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवला. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत पारकर आणि राणेंचे कार्यकर्ते काँग्रेसच्या चिन्हावर एकत्रितपणे लढले. त्या वेळी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याची राजकीय भाकिते होती; पण शिवसेनेने तीन आणि भाजपने एका जागेवर मुसंडी मारत शहरात आपले स्थान अबाधित ठेवले. एकत्रित लढणाऱ्या पारकर-राणे गटाच्या काँग्रेसने १३ जागांवर विजय संपादन करून नगरपंचायतीवर बहुमत मिळविले.

राजकीय धक्कातंत्र
राणेंच्या गोटात गेलेले संदेश पारकर तेथे फारसे स्थिरावले नाहीत. अवघ्या दीड वर्षातच त्यांनी राणेंची साथ सोडली; मात्र कणकवलीच्या राजकारणावरील पकड कायम ठेवली. त्यामुळे अडीच वर्षांनंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत पारकरांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आपल्या गटाचा नगराध्यक्ष नगरपंचायतीवर बसवून राणेंना आव्हान दिले. सन २०१३ पासून कार्यरत असलेल्या कणकवली नगरपंचायतीवर पहिली अडीच वर्षे पारकर आणि नलावडे गटाची एकत्रित सत्ता राहिली. तर नंतरची अडीच वर्षे शिवसेना आणि भाजपच्या पाठिंब्यावर पारकर गट नगरपंचायतीमध्ये सत्तेत आहे.

प्रतिष्ठा पणाला

कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पंधरा वर्षांचा कालावधी उलटला आहे. यात राजकीय संदर्भ बदलले आहेत. तसेच राजकीय प्रवाहापासून दूर असलेला नव्या पिढीचा मतदारही शहरात तयार झाला आहे. मराठा आरक्षण हाही या निवडणुकीत प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कणकवली नगरपंचायतीवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कणकवली शहरातील नेतेमंडळीनी वेगवेगळे पक्ष बदलले असले तरी नगरपंचायतीवर पहिली पाच वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे. आता चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वाभिमान, भाजप की शिवसेनेचा झेंडा फडकतो याची उत्सुकता आहे.

स्वाभिमानची संयमी रणनीती
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन हा पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. राणेंना राज्यात आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून अत्यंत शांतपणे संयमी रणनीती या निवडणुकीसाठी आखली जात आहे.

भाजपची भिस्त पारकरांवर
कणकवली नगरपंचायतीमध्ये राजश्री धुमाळे या भाजपच्या एकमेव सदस्या आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता असली तरी भाजपला कणकवली शहरात फारशी संघटना उभी करता आलेली नाही. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत भाजपची संपूर्ण भिस्त संदेश पारकर यांच्यावरच आहे. पारकर यांचे शहरात वेगळे वलय आहे. त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग देखील शहरात आहे. त्यापाठबळावर कणकवली नगरपंचायतीवरही भाजपचा झेंडा फडकेल अशी आशा भाजपची नेतेमंडळी बाळगून आहेत, पण पारकर हे पूर्वीचा करिष्मा राखणार का? यावरच भाजपच्या विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. 

प्रचारात शिवसेनेची आघाडी
कणकवली नगरपंचायतीवर आजवर शिवसेनेला भगवा फडकवता आलेला नाही. पहिल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसची नगरपंचायतीवर सत्ता राहिली. यंदाच्या निवडणुकीत; मात्र भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते नव्या उमेदीने काम करत आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली नसली तरी शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतलीय. महापैठणी, प्रत्येक प्रभागातील विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या पाठबळावर शिवसेना पक्षाचे नेते आणि उमेदवार प्रभागातील मतदारांपर्यंत पोचण्यात यशस्वी ठरलेत. हाच धडाका मतदानापर्यंत ठेवण्यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील आहेत.

दोन्ही काँग्रेससह मनसेची संघटना बांधणी
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर राष्ट्रवादीचे पारकर सुरवातीला काँग्रेस त्यानंतर भाजपमध्ये गेले. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्याने शहरातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेले आहेत. राणेंसोबत त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही महाराष्ट्र स्वाभिमानमध्ये प्रवेश केलाय. यामुळे शहरात काँग्रेसकडे मोजकेच कार्यकर्ते राहिले आहेत, तर पारकरांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षही नावापुरताच मर्यादित राहिला आहे. दुसरीकडे मनसे पक्षालाही बाळसे धरता आलेले नाही. त्यामुळे या तीनही पक्षांनी नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून संघटना बांधणीवर अधिक भर दिला आहे.

चुरस वाढणार
नगरपंचायत निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना असल्याने प्रत्येक प्रभागात चुरस निर्माण होणार आहे. शहरातील प्रभागांमध्ये सरासरी ७५० ते ११५० मतदार आहेत, तर तिरंगी निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरासरी ३०० ते ३५० मतदान घेणारा उमेदवार विजयी ठरणार आहे. 

शहराची नळयोजना, शहरातील डीपी रस्ता, मच्छी मार्केटची उभारणी व इतर विकासकामांसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांनी निधी आणला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे इतर विकासकामेदेखील पूर्ण झाली. आता विकासकामांबरोबरच पर्यटनाभिमुख नवे उपक्रम सुरू करून शहराचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. त्यासाठी शहरातील जनता राणेंच्या पाठीशी राहील, असा पूर्ण विश्‍वास आहे. कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमान पक्षाचाच झेंडा निश्‍चितपणे फडकणार आहे.
-समीर नलावडे, 

शहराध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. याखेरीज गेल्या वर्षभरात झालेल्या पालिका, नगरपंचायत निवडणुकांतही भाजपचीच सरशी झाली आहे. त्याच धर्तीवर कणकवली शहरातील मतदारही भाजपलाच कौल देतील यात कोणतीही शंका नाही. मुख्यमंत्र्यांनी कणकवली शहराच्या विकासासाठी पाच कोटी निधी मंजूर केलाय. पुढील काळात तर भुयारी गटार, क्रीडांगण व इतर अनेक योजनांसाठी कोट्यवधीचा निधी येणार आहे. संदेश पारकर यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली भाजप निश्‍चितपणे कणकवलीचे तख्त राखणार आहे.
- प्रमोद जठार,
जिल्हाध्यक्ष भाजप

शहरातील काँग्रेसच्या सत्तेला, अंतर्गत राजकारण आणि गटबाजीला जनता कंटाळलीय. आणखी किती वर्षे शहरातील नागरिक सांडपाणी, वाहतूक कोंडी, कचरा आदी समस्या सहन करणार. शहरातील मतदारांना प्रलोभने आणि पोकळ आश्‍वासने नकोत, तर ठोस विकासकामे हवी आहेत. त्यासाठी सर्वच मतदार सत्ता बदल करण्यास उत्सुक आहेत. यंदा परिवर्तन निश्‍चित असून शहरातील सर्व मतदारांची शिवसेनेला खंबीर साथ असणार आहे. गेली पंचवीस वर्षे रखडलेला बांदकरवाडी रेल्वे भुयारी मार्गाचा प्रकल्प आम्ही मार्गी लावला.
-सुशांत नाईक,
नगरसेवक शिवसेना

नगरपंचायत स्थापन होऊन १५ वर्षे झाली, तरीही शहरातील मूलभूत समस्या आजवरच्या सत्ताधाऱ्यांना मार्गी लावता आलेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील डॉक्‍टर्स, वकील, इंजिनिअर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना मनसेच्या झेंड्याखाली एकत्र आणून आम्ही नगरपंचायतीची निवडणूक लढविणार आहोत. या सर्व मंडळींच्या अनुभवाचा फायदा घेऊन मनसेला शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यासाठी आम्ही यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीची तयारी करीत आहोत.
- राजन दाभोलकर,
मनसे जिल्हाध्यक्ष

नगरपंचायतीची पहिली निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली होती. त्यानंतर पहिल्या पाच वर्षांतच शहरातील गार्डन, बसथांबे, मच्छी मार्केटची पायाभरणी, पर्यटन केंद्र, सर्व प्रभागांत पथदीप व इतर विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी निधी दिला. अग्निशमन बंबासाठीही तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांनी निधी पुरवला होता. आता पुन्हा एकदा शहरविकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी नगरपंचायत निवडणुकीत उतरणार आहे. त्यासाठी सर्व १७ प्रभागांत आमचे उमेदवारही  तयार आहेत.
-अबिद नाईक, 

युवक प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी गेली दहा वर्षे आलटून पालटून सत्ता उपभोगली, पण सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, सार्वजनिक स्वच्छतागृहे या मूलभूत समस्या त्यांना सोडवता आल्या नाहीत. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वबळावर उतरणार आहे. तसेच ड्रेनेज, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था, प्रत्येक वाडीला जोडणारे शहर आराखड्यातील रस्ते पूर्णत्वाला प्राधान्य देणार आहे.
-विलास कोरगावकर,
शहराध्यक्ष काँग्रेस

हे आहेत प्रश्‍न
कणकवली नगरपंचायतीची स्थापना होऊन १५ वर्षांचा कालावधी उलटला. नगरपंचायतीची स्थापना होत असताना शहराचा विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा प्रत्येक शहरवासीयांची होती; मात्र राजकीय साठमारीत शहरातील मूलभूत समस्या तशाच राहिल्या आहेत. यात सांडपाणी निचरा ही मोठी डोकेदुखी शहरवासीयांना होऊन बसली आहे. दरवर्षी एक कोटी निधी खर्च झाला असता तरी शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्‍न मार्गी लागला असता; पण त्याकडे आजवरच्या कुठल्याच राज्यकर्त्यांनी गांभीर्याने पाहिलेले नाही. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत गेल्या तीन महिन्यांत शहरात चांगली स्वच्छता आहे, मात्र घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

नवीन रस्ते, मच्छी मार्केट, भाजी मार्केटची उभारणी
 मागील १५ वर्षांतील राज्यकर्त्यांनी शहरातील सर्व रस्ते गुळगुळीत ठेवले आहेत. पटकीदेवी मंदिरानजीक मच्छीमार्केटची बांधणी पूर्ण झाली आहे, तर तेलीआळी डीपीरोड लगत भाजीमार्केटची उभारणी सुरू आहे. शहरात तेलीआळी डीपी रस्ता, तेली आळी ते हॉटेल सह्याद्री या दोन नवीन रस्ते खुले झाले. टेंबवाडी, शिवशक्‍तीनगर, साईनगर येथे नवीन उद्याने तयार झाली. गणपतीसाणा सुसज्ज झाला. सर्वच प्रभागांत पथदीप आणि हायमास्टचीही उभारणी झाली. 

क्रीडांगण, सांस्कृतिक भवन, पर्यटन उपक्रमांची गरज
शहरात येणारी राज्य ते केंद्रस्तरावरील मंडळी दरवर्षी अद्ययावत स्टेडियची ग्वाही देतात, पण गेल्या पंधरा वर्षांत क्रीडांगण उभारणीसाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. पुढील पाच वर्षांत तरी नगरपंचायतीचे क्रीडांगण उभे राहावे, अशी अपेक्षा शहरवासीयांची आहे. कणकवली ही जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते; पण नगरपंचायतीचे सांस्कृतिक भवन उभारणीचा विषय कुठल्याच राज्यकर्त्यांनी अजेंड्यावर ठेवलेला नाही. शहरात पर्यटन केंद्राची बांधणी झाली आणि अल्पावधीतच ते धूळखात पडले आहे. शहरात पर्यटक स्थिरावण्यासाठी पर्यटनविषयक विविध उपक्रम राबविले जावेत, अशीही शहरवासीयांची अपेक्षा आहे. याखेरीज रोजगारनिर्मितीक्षम उपक्रम राबविण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election