अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत कणकवली

राजेश सरकारे
शुक्रवार, 2 मार्च 2018

कणकवली - यंदाची निवडणूक एकसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने होत आहे. त्यासाठी यंदा नव्याने प्रभागरचना करण्यात आली. या पुनर्रचित प्रभागात अनेक वाड्या विभागल्या गेल्या आहेत. शहरात एकूण १७ प्रभाग करण्यात आले आहेत. या प्रभागातील समस्या, झालेली विकासकामे याचा मागोवा घेणारी मालिका आजपासून सुरू करीत आहोत. 

कणकवली - शहरातील ग्रामीण भाग असलेल्या निम्मेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी आणि पिळणकरवाडीचा काही भाग प्रभाग एकमध्ये समाविष्ट झाला आहे. मच्छी मार्केट हे या प्रभागातील विकासकाम गेल्या पाच वर्षात मार्गी लागले आहे. तर वाड्यात जाण्यासाठी प्रशस्त रस्ते, पायवाटा पुरेशा झालेल्या नाहीत.

मधलीवाडी, सुतारवाडी यावाडीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सांडपाणी निचरा समस्या देखील या प्रभागात आहे. शहरातील मधलीवाडी भागात नव्याने कॉम्प्लेक्‍स होत आहेत. उर्वरित भाग अजूनही ग्रामीण अवस्थेतच आणि विकासाच्या प्रतीक्षेत राहिला आहे.

अशी आहे रचना... 

  •  प्रभाग एकची लोकसंख्या - ८३७
  •  नगरसेवक आरक्षण - सर्वसाधारण महिला
  •  प्रभागात समाविष्ठ भाग -  निम्मेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी, पिळणकरवाडी. 
  •  रचना - उत्तर दिशा - जानवली नदीपासून उत्तर-पश्‍चिम हद्दीपर्यंत. पूर्वेला - नागवे हद्द ते निम्मेवाडी रेल्वेलाइन हद्दीपर्यंत. पश्‍चिम - जानवली नदी ते रवळनाथ मंदिर मार्गे मच्छीमार्केट रस्ता मार्गे म्हसकर घर.
     

येथील ग्रामदैवत श्रीस्वयंभू रवळनाथ, फलाहारी महाराज आश्रम, श्रीराममंदिर प्रभाग एक मध्ये येते. या प्रभागातील सर्वाधिक भाग ग्रीन झोन मध्ये आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत प्रभाग एक खूपच मागे पडला आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून या प्रभागात अंतर्गत रस्ते, पायवाटांचे क्राँक्रिटीकरण आणि विद्युतीकरण झाले आहे. नळ योजना देखील सर्व वाड्‌यांमध्ये गेली आहे; मात्र या प्रभागातील सर्वच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

नगरपंचायत राहणाऱ्या ज्या नागरिकांना घरे नाहीत, त्यांना घरे बांधून देण्यासाठी असलेले ‘हाऊस फॉर डिसहाऊस’ हे आरक्षण देखील याच प्रभागात आहे; परंतु हे आरक्षण विकसित करण्याबाबत मागील पंधरा वर्षात कुठल्याच राज्यकर्त्यांनी विचार केलेला नाही.

प्रभाग एकचा बहुतांश भाग जानवली नदीच्या किनाऱ्यावर आहे. याठिकाणी काही शेतकरी आजही ऊस शेती करतात. तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भातशेती होते. येथील जानवली नदीवर नद्या सक्षमीकरण योजनेंतर्गत बंधारे प्रस्तावित आहेत; मात्र त्याबाबतची कार्यवाही झाली नसल्याने उन्हाळी शेती होत नाही. पावसाळी चार महिने वगळता येथील जमिनी कोरड्या असतात. या ठिकाणी बारमाही शेती व बागायती झाली असती तर स्थानिकांना उत्पन्नाची मोठी संधी मिळाली असती. पण त्याकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. याच प्रभागात पूर्वी उसाचे गुऱ्हाळ होते. बॉक्‍साईटच्या खाणीही होत्या. मात्र त्या कालांतराने बंद पडल्या.

शहरातून जाणारा रिंगरोड प्रभाग एक मधून प्रस्तावित आहे. चौंडेश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर तेथून स्वयंभू मंदिर ते दत्तमंदिर ते रेल्वे स्थानकापर्यंत नियोजित रस्ता झाला असता तर या भागाच्या विकासाला चालना मिळाली असती; परंतु त्याबाबत देखील गेल्या पंधरा वर्षात कार्यवाही झालेली नाही. एवढेच नव्हे तर शहराचा रिंगरोड साकारण्याबाबतचा विषय कुठल्या सभेत अजेंड्यावर आलेला नाही. प्रभाग एकला जानवली नदीची किनार आहे. या भागात पाणी देखील संथ आणि खोल असल्याने बोटींग सुविधा होणे आवश्‍यक होते. तसे झाल्यास शहरात नवीन पर्यटनाचे माध्यम देखील सुरू होऊ शकते.

शहराचे सुसज्ज असे मच्छीमार्केट या प्रभागात बांधून पूर्ण झाले आहे. याच मच्छीमार्केटमध्ये शहरातील चिकन आणि मटन विक्रेत्यांनाही आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु श्रेयाच्या राजकारणामुळे ते शक्‍य झालेले नाही.

नगरपंचायतीच्या २००३ च्या निवडणुकीत या प्रभागातून विद्यमान उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह रवींद्र राणे, जयश्री कांबळे यांनी प्रतिनिधित्व केले होते. २००८ निवडणुकीत किशोर राणे, विशाखा कांबळे, समृद्धी पारकर यांनी या भागाचे नेतृत्व केले होते. २०१३ च्या निवडणुकीत किशोर राणे, सुविधा साटम, ॲड.प्रज्ञा खोत, गौतम खुडकर या भागातून विजयी 
झाले होते.  

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election