शिवसेना-भाजप युतीबाबत पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

कणकवली - संदेश पारकर पुढील काळात नारायण राणेंच्या गटाशी हातमिळवणी करणार नाहीत या अटीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पुन्हा युतीबाबत बोलणी सुरू झाली. यात १७ पैकी १२ जागांवर तोडगा निघाला तर ४ जागांवर युतीचे घोडे अडले होते. याबाबत आज (ता.१९) सकाळी दहा पर्यंत तोडगा निघेल, अशी शक्‍यता भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून व्यक्‍त झाली.

कणकवली - संदेश पारकर पुढील काळात नारायण राणेंच्या गटाशी हातमिळवणी करणार नाहीत या अटीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा युतीबाबत बोलणी सुरू झाली. यात १७ पैकी १२ जागांवर तोडगा निघाला तर ४ जागांवर युतीचे घोडे अडले होते. याबाबत आज (ता.१९) सकाळी दहा पर्यंत तोडगा निघेल, अशी शक्‍यता भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून व्यक्‍त झाली.

शिवसेना-भाजप युती करताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर असतील यावर एकमत झाले आहे. त्यानंतर प्रभाग २, प्रभाग १०, प्रभाग ११ आणि प्रभाग १४ या चार जागांवर चर्चा सुरू राहिली आहे. या चारही जागा शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. यातील प्रभाग दोन मध्ये शिवसेनेच्या साक्षी आमडोसकर आणि प्रभाग ११ मधील जागा शिवसेनेने सुजित जाधव यांना सोडण्यास भाजपने तयारी दर्शवली आहे; मात्र प्रभाग १० आणि प्रभाग १४ मध्ये तडजोड झालेली नाही. या दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत द्यावी असाही पर्याय भाजपने दिला आहे; मात्र शिवसेनेचे नेतेमंडळी राजी झालेली नाहीत. मैत्रीपूर्ण लढत द्यायची तर नगराध्यक्षासह सर्वच प्रभागात लढूया याही पर्याय शिवसेना नेत्यांनी ठेवला आहे.

प्रभाग १४ मध्ये शिवसेनेचे संजय पारकर आणि भाजपचे रूपेश नार्वेकर हे दावेदार आहेत. यात पारकर हे आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक आहेत. तर विद्यमान नगरसेवक रूपेश नार्वेकर हे संदेश पारकर यांचे उजवे हात मानले जातात. या पारकर-नार्वेकर यांच्यासाठी शिवसेना आणि भाजपची नेतेमंडळी मागे हटायला तयार नाहीत. तशीच स्थिती प्रभाग दहा मध्ये आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी बोलणी स्थगित ठेवण्यात आली आहे. उद्या (ता.१९) याबाबत अंतिम तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, पुढील काळात राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याची शक्‍यता असल्याने, शिवसेनेने भाजपसोबत युती करण्यास नकार दिला होता. परंतु भाजपचे संदेश पारकर यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राहील, अशी ग्वाही शिवसेनेला दिली आहे. पुढील काळात राणेंचा स्वाभिमान भाजमध्ये आला तरी आपला गट स्वतंत्र राहील तसेच युती देखील अभेद्य राहील अशीही ग्वाही संदेश पारकर यांच्यासह भाजपच्या जिल्ह्यातील नेतेमंडळींनीही दिल्याची चर्चा आहे.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election