स्वाभिमानला रोखण्यासाठी सेना-भाजप युती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी ऐनवेळी शिवसेना-भाजप तडजोड करून एकत्र आल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा एक नवा फॉर्म्युला तयार झाला असून, काँग्रेस एकाकी पडली आहे. शहर विकास आघाडीने लढतीत उडी घेतल्यामुळे या खेपेस रंगत वाढणार आहे.

कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी ऐनवेळी शिवसेना-भाजप तडजोड करून एकत्र आल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा एक नवा फॉर्म्युला तयार झाला असून, काँग्रेस एकाकी पडली आहे. शहर विकास आघाडीने लढतीत उडी घेतल्यामुळे या खेपेस रंगत वाढणार आहे.

येथील नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना-भाजपमध्ये युती झाली; मात्र चार प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत होणार असून, या वाटाघाटीत शिवसेनेला पाच; तर भाजपला ़आठ प्रभाग देण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ही दिलजमाई केली. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासाठी स्पर्धा थोडी कमी झाली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी शिवसेना भाजपला ही जुळवाजुळव करावी लागली. स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीला एक जागा देऊन बोळवण केली; मात्र स्वाभिमानला रोखण्यासाठी युतीने तडजोड स्वीकारली.

निवडणूक जाहीर झाल्यापासून शहर विकास आघाडीने मित्रपक्ष शोधण्यात वेळ घालविला. त्यामुळे अखेरच्या क्षणात त्यांना स्वतंत्र लढणे हाच पर्याय पुढे आला. परिणामी आता नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून संदेश पारकर, स्वाभिमानकडून समीर नलावडे, काँग्रेसचे विलास कोरगावकर आणि शहर विकास आघाडीचे राकेश राणे हे उमेदवार आहेत. उर्वरित चार उमेदवार हे डमी आहेत. त्यामुळे ही निवडणुक चौरंगी होईल.

शिवसेना-भाजपची सर्व मदार ही संदेश पारकर आणि आमदार वैभव नाईक यांच्या खांद्यावर आहे. स्वाभिमानसाठी आमदार नितेश राणे आणि समीर नलावडे हे स्वतःची यंत्रणा राबविणार आहेत. काँग्रेस पक्षाने उभारी घेण्याचा चांगला प्रयत्न केला. 

तब्बल दहा जागांवर त्यांनी उमेदवार दिले. शहर विकास आघाडी प्रथमच ताकद अजमावणार असून, खुल्या प्रवर्गाच्या नाराजीचा त्यांना कितपत फायदा होईल हे निकालात स्पष्ट होईल; मात्र प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची मते निर्णायक ठरतील असे चित्र आज स्पष्ट झाले. 
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २६ पर्यंत मुदत आहे. त्यानंतर खरे लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

उमेदवारांची भाऊगर्दी

कणकवली येथील नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण ८६ अर्ज आज दाखल झाले; तर नगराध्यक्षपदासाठी ८ जणांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. उद्या (ता. २०) अर्जांची छाननी होणार आहे. २६ पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमानमधून समीर नलावडे आणि भाजपमधून संदेश पारकर यांच्यात प्रमुख मुकाबला होईल.

याखेरीज गाव आघाडीचे राकेश राणे आणि काँग्रेसचे विलास कोरगावकर हेदेखील नगराध्यक्षपदासाठी लढत देणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आहे; तर शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली; तरी चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्‍यता आहे. तसेच गाव आघाडीनेदेखील ९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची पाटी मात्र कोरी आहे. या पक्षाकडून एकही अर्ज सादर झालेला नाही.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election