कणकवली नगरपंचायतीची मतमोजणी १२ एप्रिलला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कणकवली -  कणकवली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ७ ऐवजी १२ एप्रिलला होणार आहे; तर प्रभाग १० चे मतदान ६ ऐवजी ११ एप्रिलला होणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.

कणकवली -  कणकवली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ७ ऐवजी १२ एप्रिलला होणार आहे; तर प्रभाग १० चे मतदान ६ ऐवजी ११ एप्रिलला होणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. प्रभाग १० मधील हरकतींची सुनावणी लांबली होती. त्यामुळे उमेदवारांना चिन्हवाटप होण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रभाग १० चे मतदान आणि सर्व प्रभागांतील मतमोजणी पुढे ढकलली आहे.

जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने प्रभाग १० मधील उमेदवार शीतल रामदास मांजरेकर (भाजप) आणि स्वाती अजित काणेकर (काँग्रेस) या उमेदवारांचे अर्ज २० मार्चला फेटाळले होते. या निर्णयाविरोधात या दोन्ही उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. याची सुनावणी २८ मार्चला झाली. यात या दोन्ही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले. 

हा निकाल होईपर्यंत प्रभाग १० मधील निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवली होती. २८ ला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रभाग १० मधील उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली होती. तर वैध ठरलेल्या उमेदवारांना १ एप्रिलला चिन्हवाटप झाले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिन्हवाटप झाल्यानंतर किमान ८ दिवस प्रचारासाठी देणे आवश्‍यक ठरते. मात्र, कणकवली नगरपंचायतीसाठी मतदान ६ एप्रिल आणि मतमोजणी ७ एप्रिलला होणार होती. 

प्रभाग १० मधील उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळत असल्याने, या प्रभागातील मतदान ६ ऐवजी ११ एप्रिलला करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. तसेच शहरातील सर्वच प्रभागाची मतमोजणी ७ एप्रिलऐवजी १२ एप्रिलला करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election