कणकवली नगरपंचायत निवडणूकीत राणेंची निर्विवाद सत्ता

तुषार सावंत
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कणकवली - अखेर राज्याची उत्सुकता लागून राहिलेली कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या स्वाभिमान पक्षाची निर्विवाद सत्ता मिळाविली आहे. १७ पैकी ११ जागा मिळवत निर्विवाद बहुमत स्वाभिमान पक्षाने मिळविले. 

कणकवली - अखेर राज्याची उत्सुकता लागून राहिलेली कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या स्वाभिमान पक्षाची निर्विवाद सत्ता मिळाविली आहे. १७ पैकी ११ जागा मिळवत निर्विवाद बहुमत स्वाभिमान पक्षाने मिळविले.

कणकवलीच्या नगराध्यक्षपदी स्वाभिमान राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर नलावडे यांची बाजी मारली. त्यांनी भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला. 

 

पक्षीय बलाबल

  • स्वाभिमान - 10
  • राष्ट्रवादी - 1
  • शिवसेना - 3
  • भाजप - 3

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपच्या तिकीटावर राज्यसभेचे खासदार झालेले नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने कणकवली या होम ग्राऊंडवरील पहिल्याच लढाईत दणदणीत विजय मिळवून शिवसेना- भाजप या कट्टर प्रतिस्पर्धींना जिल्ह्यात एक धोक्‍याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार इतका मोठा लवाजमा प्रचारात उतरवूनही शिवसेना - भाजप युतीचे तगडे उमेदवार असलेले संदेश पारकर अवघ्या 37 मतांनी मराभूत झाले. मात्र राणेंच्या स्वाभिमानचे समीर नलावडे हे अनपेक्षितरित्या विजयी झाले. या यशाचे खरे शिल्पकार हे राणेंचे धाकले चिरंजीव आमदार नितेश राणे हेच ठरले. या निवडणुकीत स्वाभिमानने 17 पैकी 10 जागा जिंकून कणकवलीच्या नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली. 

कणकवली नगरपंचायतीसाठी 16 प्रभागात 6 एप्रिलला तर प्रभाग 10 मध्ये 11 एप्रिलला मतदान झाल्यानंतर येथील तहसिल कार्यालयात मतमोजणी होवून निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने शिवसेना- भाजप युतीला पराभूत करून नगरपंचायतीवर बहुमताने आपला झेंडा लावला. निकाल घोषित झाल्यानंतर शहरात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात मिरवणूक काढून विजयी आनंद लुटला. या विजयी रॅलीत आमदार नितेश राणे आणि उमेदवार सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी उशिरापर्यंत स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात जल्लोष सुरू ठेवला होता. 

कणकवलीची निवडणुक राज्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरत होती. याचे कारण या निवडणुकीत नेहमीच राज्याच्या मंत्रीमंडळातील बरेच मंत्री प्रचारात उतरत असत. त्यातच हाणामाऱ्या यामुळे कणकवलीची निवडणुक अतिसंवेदनशील असायची. मात्र 2014 च्या निवडणुकीत राणेंच्या पराभवानंतर शिवसेना भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्‍वास प्रचंड वाढला होता. याचे कारण राणे कॉंग्रेसमध्ये असताना मालवणच्या विधानसभेनंतर वांद्रेतही पराभूत झाले. अखेर त्यांनी कॉंग्रेस सोडून नवा पक्ष काढला. तेथूनही भाजपच्या गोठात सामील झाले. त्यामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचा तिळपापड झाला. पण जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप यांचे नाते विळ्या भोपळ्यासारखे असले तरी राणेंना पराभूत करण्यासाठी ही मंडळी नेहमीच एकत्र येत असतात.

या खेपेस मात्र या मंडळींनी कणकवलीच्या निवडणुकीकडे तशी डोळेझाक केली. संदेश पारकरच्या रूपाने हुकमी एक्का दिल्याच्या थाटात वागत होते. मात्र आमदार नितेश राणे यांनी गेले चार महिने या निवडणूकीचे गांभीर्याने नियोजन केले होते. गेले 15 दिवस ते ठाण मांडून कणकवलीत होते. राणेंनी राज्यसभेच्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी येवून कणकवलीत जाहीर सभा घेतली. तेव्हाच नगराध्यक्ष आणि तेरा नगरसेवक निवडून येतील असे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र यंदा शहरविकास आघाडी रिंगणात उतरून मराठा समाजाला गोंजारल्याने राणेंच्या स्वाभिमानच्या गोटातही अस्वस्थता पसरली होती. त्यातच संदेश पारकरांसारखा उमेदवार शिवसेना भाजप युतीकडे असल्याने स्वाभिमाननेही निवडणूक फारच जिव्हारी लावून घेतली होती.

पक्ष स्थापनेनंतरची पहिली निवडणुक होम ग्राऊंडवर लढण्यासाठी प्रचारात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. विशेषतः आमदार श्री. राणे यांनी मतदान होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःची वेगळी यंत्रणा ठेवली होती. परिणामी स्वाभिमानला पहिल्याच निवडणूकीत थेट नगराध्यक्षपदाच्या रूपाने 37 इतक्‍या मताधिक्‍याने मिळालेला निसटता विजय त्यांच्या विरोधकांना मात्र धोक्‍याची घंटा आहे. 

विजयी उमेदवार

प्रभाग १- कविता किशोर राणे (स्वाभिमान)

प्रभाग २- प्रतीक्षा सावंत (स्वाभिमान)

प्रभाग३- अभिजित मुसळे (स्वाभिमान)

प्रभाग ४- अबीद नाईक (राष्ट्रवादी)

प्रभाग ५- मेघा गांगण (स्वाभिमान)

प्रभाग ६- सुमेधा अंधारी (भाजपा)

प्रभाग ७- सुप्रिया नलावडे (स्वाभिमान)

प्रभाग ८- उर्मी जाधव (स्वाभिमान)

प्रभाग  ९ - मेघा सावंत (भाजपा)

प्रभाग १०- माही परुळेकर (शिवसेना)

प्रभाग ११- विराज भोसले (स्वाभिमान)

प्रभाग १२- गणेश उर्फ बंडू हर्णे (स्वाभिमान)

प्रभाग - 13 - सुशांत नाईक - शिवसेना

प्रभाग - 14 - रुपेश नार्वेकर - भाजप

प्रभाग - 15 - मानसी मुंज - शिवसेना

प्रभाग - 16 - संजय कामतेकर - स्वाभिमान

प्रभाग 17 - रवींद्र गायकवाड - स्वाभिमान

नगराध्यक्ष - समीर नलावडे - स्वाभिमान - 37 मतांनी विजयी

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election