राणेंच्या "स्ट्रॅटर्जी'ला युतीच्या शह-काटशहाचे बळ 

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कणकवली - आमदार नितेश राणे यांची परफेक्‍ट निवडणूक "स्ट्रॅटर्जी'च्या आणि शिवसेना-भाजपचे अंतर्गत शह-काटशह यामुळे कणकवलीवर नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले. ज्या शहराने संदेश पारकर यांना युवा नेतृत्व अशी राज्यात ओळख निर्माण करून दिली त्याच शहराने पंधरा वर्षानंतर त्यांना मोठा पराभव दाखवला. मराठा कार्डचा संभाव्य तोटा ओळखून स्वाभिमानने आखलेली राजकीय रणनिती त्यांच्या पथ्यावर पडली. मात्र या निवडणूकीत शिवसेनेपेक्षाही भाजपच्या संघटनात्मक मनोधैर्यावर मोठा आघात झाला.

कणकवली - आमदार नितेश राणे यांची परफेक्‍ट निवडणूक "स्ट्रॅटर्जी'च्या आणि शिवसेना-भाजपचे अंतर्गत शह-काटशह यामुळे कणकवलीवर नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले. ज्या शहराने संदेश पारकर यांना युवा नेतृत्व अशी राज्यात ओळख निर्माण करून दिली त्याच शहराने पंधरा वर्षानंतर त्यांना मोठा पराभव दाखवला. मराठा कार्डचा संभाव्य तोटा ओळखून स्वाभिमानने आखलेली राजकीय रणनिती त्यांच्या पथ्यावर पडली. मात्र या निवडणूकीत शिवसेनेपेक्षाही भाजपच्या संघटनात्मक मनोधैर्यावर मोठा आघात झाला.

कणकवली शहर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची ओळख सांगणारे म्हणून परिचीत आहे. मात्र या शहराने राणेंना अनेक राजकीय चढ-उतार दाखवले. 2003 मध्ये राणेंचे राजकीय करिअर शिखरावर होते. त्यावेळी झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार संदेश पारकर यांनी राणेंच्या पॅनलला पराभवाची चव चाखली. त्यावेळी पारकर राज्यस्तरावरील युवा नेते म्हणून समोर आले.

राणेंचे थेट प्रतिस्पर्धी अशी ओळख त्या निवडणूकीने पारकर यांना मिळाली. यानंतर राजकिय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पुढे पारकर राणेंचे नेतृत्व मानून कॉंग्रेसमध्ये आले. यात पारकर यांचे राजकिय महत्त्व कमी होत गेले. नंतर राणेंची साथ सोडून त्यांनी भाजपची कास धरली. मावळत्या नगरपंचायत कार्यकारीणीत आपले सत्ताबळ सिध्द करून राणेंच्या समर्थकांना विरोधी बाकावर बसवले. मात्र आज लागलेला निकाल पारकर यांच्या राजकिय करिअरच्या दृष्टिने खूप मोठा धक्‍का मानावा लागेल. 

स्वतः संदेश पारकर नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून उतरतील अशी शक्‍यता फार कमी होती. त्यातच निवडणूकीची मोर्चेबांधणी करताना चित्र-विचित्र राजकिय समीकरणे तयार झाली. एकीकडे नारायण राणे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले. मात्र त्याच काळात कणकवलीत राणेंचा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. राज्यात एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेना-भाजपने कणकवलीत हातमिळवणी केली. यामागेही राज्यस्तरावरून ठरलेला अंतर्गत राजकिय डाव असल्याची चर्चा निवडणूक काळात रंगली होती. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षासाठी हा एकप्रकारचा चक्रव्यूह होता. विजय हाच यावरचा उपाय होता. अन्यथा राणेंना कणकवली राखता आली नाही असा संदेश राज्यस्तरावर जाण्याची शक्‍यता होती. 

संदेश पारकर यांचे शहरात असलेले गुडवील लक्षात घेऊन त्यांना नगराध्यक्ष पदासाठी आग्रह करण्यात आला. ऐनवेळी आलेली ही जबाबदारी त्यांनी स्विकारली. शिवसेनेशी युती असल्यामुळे निवडणूक सोपी असल्याचे चित्र वरवर दिसत होते. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला. मात्र प्रचारातील रंगत वाढत जाण्याबरोबरच युतीच्या वर्चस्वाचे स्वप्न हळूहळू वास्तवापासून दूर जावू लागले. याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमानसाठी शहराचे स्टॅटीस्टीक ओळखून आखलेली निवडणूक स्टॅटजी. 

शहरविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी मराठा चेहरा दिला. याबरोबरच इतर प्रस्तापित पक्षांनी नगराध्यक्ष पद खूले असूनही ओबीसी उमेदवारांना संधी दिल्याचा मुद्‌द प्रचारात मांडला. शिवसेना-भाजपच्या तुलनेत स्वाभिमानकडे राणेंच्या रूपाने मराठा नेतृत्व आहे. यामुळे या आघाडीच्या प्रचाराचा परिणाम स्वाभिमानवर जास्त प्रमाणात होण्याची शक्‍यता होती.

ही स्थिती वेळीच ओळखून आमदार राणे यांनी त्यावरचा उतारा शोधला. शहर आघाडीसाठी मराठा कार्डचा प्रचार करणारे काही कार्यकर्ते शेवटच्या टप्प्यात राणेंसोबत दिसत होते. शिवाय या प्रचारामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी इतर ठिकाणच्या मतांचा कोटा वाढवण्याच्या दृष्टिने स्वाभिमानने आखणी केली. जिल्हाभरातील स्वाभिमानचे प्रमुख पदाधिकारी कणकवलीत उतरून प्रत्येक प्रभागाची जबाबदारी दिली गेली. त्यावर लक्ष ठेवणारी आणि रसद पुरवणारी फळी आमदार राणे यांनी उभी केली. त्यामुळे त्यांच्या प्रचारात सुसुत्रता होती. शिवाय प्रत्येक मतदाराचा अभ्यास करून स्वाभिमानसाठी विजयी मतांच्या बेरीजेच्या राजकारणाचा आराखडा आणि त्यावरचा अंमल या दोन्ही गोष्टी "परफेक्‍ट' घडवून आणण्यात आल्या. 

या उलट शिवसेना-भाजपची स्थिती होती. भाजपच्या नेत्यांमध्ये फारसा सुसंवाद प्रचारादरम्यान दिसला नाही. पारकर नगराध्यक्षपदी निवडून आले असते तर 2003 प्रमाणे ते पुन्हा एकदा राजकिय हिरो ठरले असते. राणेंच्या पॅनलचा पराभव केल्याने भाजपच्य वरिष्ठ वर्तुळाच्या ते नजरेत आले असते. आगामी विधानसभेची गणितेही आता आखली जात आहेत. यातही भाजपतर्फे पारकर यांनी दावा केला असता.

प्रचारादरम्यान हा मुद्‌दा ही चर्चेला आला होता. शहरात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि माजी आमदार राजन तेली या भाजपमधील बड्या नेत्यांचा राजकिय प्रभाव आहे. मात्र हे दोन्ही नेते प्रचारात अपेक्षेइतके सक्रिय दिसले नाही. 2003 नंतरची पाच वर्षे वगळता स्वतः संदेश पारकर शहराच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. शहरातील सर्व धुरा त्यांचे बंधू कन्हैया पारकर यांच्या हातात होती. ऐनवेळी संदेश यांना उमेदवारी मिळाल्याने काही प्रमाणात याचाही प्रभाव जाणवला. तरीही त्यांना मिळालेल्या मतांमध्ये वैयक्‍तिक प्रभावाचा वाटा मोठा आहे.

शिवसेनेही युती म्हणून अपेक्षित काम केल्याचे चित्र एकूण निकालावरून दिसत नाही. शिवाय स्वाभिमानकडे असलेले बहूसंख्य उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते हे कधीकाळी संदेश पारकर यांचे साथीदार होते. त्यामुळेसुध्दा पारकर यांची ताकद काही प्रमाणात विभागली गेली. हा पराभव अवघ्या 37 मतांचा असला तरी संदेश पारकर यांच्या दृष्टिने मोठा आहे. कारण त्यांच्या पुढच्या राजकिय महत्त्वकांक्षावर याचा परिणाम होणार आहे. भाजपमधील शह-काटशहाच्या राजकारणात या पराभवाने ते खूप मागे पडले आहेत. 

विजयी नगरसेवकांची आकडेवारी पाहता नारायण राणेंसाठी हा निर्वीवाद विजय म्हणावा लागेल. मात्र मतांची आकडेवारी बरेचकाही सांगून जाणारी आहे. या निवडणूकीसाठी स्वाभिमानने पूर्ण ताकद लावली होती. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. असे असूनही नगराध्यक्ष पदासाठी अनेक अंतर्गत अडथळे असतानाही युतीला मिळालेली मते दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. नगरसेवक पदांच्या आकडेवारीतही दोन्ही स्पर्धकांमध्ये काही प्रभागात फारसा फरक नाही.

ही स्थिती पाहता कणकवलीत आजही राणेंच्या विरोधातील मते विचार करण्यासारखी आहेत. अर्थात निवडणूकीचे गणित जय-पराजयावर ठरत असते. त्यातही नगरपंचायतीच्या निवडणूकामध्ये वैयक्‍तिक उमेदवारांचा प्रभाव, स्थानिक हेवेदावे याचा अधिक प्रमाणात परिणाम होत असतो. या सगळ्या गणितात स्वाभिमान पक्ष अर्थातच पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी निर्वीवाद वर्चस्व राखले हे मान्यच करावे लागेल. 

"ती' 34 "ही' 37 
कणकवली विधानसभा मतदारसंघात 2009 च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार व राणे समर्थक रवींद्र फाटक यांचा भाजपचे प्रमोद जठार यांनी अवघ्या 34 मतांनी पराभव केला होता. कॉंग्रेस आणि मित्र पक्षात झालेले अंतर्गत राजकारण, काही जातीय समीकरण यामुळे असा निकाल लागल्याचे त्यावेळी मानले जात होते. कणकवली शहरातील राजकिय गणिताचा त्याकाळात जठार यांना मोठा फायदा झाला होता. याच शहरात 2003 मध्ये नगरपंचायत लढतीत संदेश पारकर यांनी राणेंच्या पॅनलचा पराभव केला होता. त्याच कणकवलीत राणेंच्या स्वाभिमान पक्षाने भाजपच्या संदेश पारकर यांचा 37 मतांनी पराभव केला. हे तिन्ही राजकिय संदर्भ या निवडणूकीच्या निमित्ताने चर्चेला आले. 

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election