कणकवली नगरपंचायत निवडणूकीत शहर विकास आघाडीचीच धास्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

शहरविकास आघाडीसह स्वाभिमान, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस -राष्ट्रवादी या पक्षांनी सर्व जागा लढविण्याचा निर्धार व्यक्‍त केल्याने, यंदाची नगरपंचायत निवडणूक पंचरंगी होण्याची शक्‍यता आहे.

कणकवली - मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर एकवटलेल्या मराठा समाज बांधवांनी नगरपंचायत निवडणूक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे निश्‍चित केले आहे. त्याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. शहरविकास आघाडीसह स्वाभिमान, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस -राष्ट्रवादी या पक्षांनी सर्व जागा लढविण्याचा निर्धार व्यक्‍त केल्याने, यंदाची नगरपंचायत निवडणूक पंचरंगी होण्याची शक्‍यता आहे.

कणकवली नगरपंचायतीमध्ये यंदा थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडून येणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले आहे. त्यामुळे अनेक पक्षातील दिग्गज नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. याखेरीज नगरसेवक होण्यासाठीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र यंदा प्रथमच पक्षविरहित अशी शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय शहरातील प्रमुख नागरिकांनी घेतला आहे. या आघाडीच्या सध्या बैठका सुरू असून प्रत्येक प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चितीचे काम सुरू करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांमधून निवडणूक लढवून डोकेदुखी वाढविण्यापेक्षा, शहर विकास आघाडीतून निवडणूक लढविण्याला अनेक विद्यमान आणि संभाव्य इच्छुक उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे. तसे झाल्यास त्या प्रभागामध्ये प्रभाव असलेले उमेदवार गमावण्याची भीती राजकीय पक्षांना सतावत आहे. 

सद्यःस्थितीत स्वाभिमान, शिवसेना आणि भाजप या पक्षांनी १० ते १२ प्रभागातील संभाव्य उमेदवारांची निश्‍चिती केली आहे. उर्वरित ५ ते ६ प्रभागामध्ये किमान तीनशे मतांचे पाठबळ असलेल्या सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. पक्ष विरहित असलेल्या शहर विकास आघाडीने शहरातील बाजारपेठ वगळता इतर प्रभागांमध्ये उमेदवार निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक वाडीतून सर्वमान्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे शहर विकास आघाडीमधून १७ प्रभागात कोण उमेदवार निश्‍चित केले जातात, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायत स्थापन झाल्यापासूनच्या निवडणुका दुरंगी, तिरंगी झाल्या होत्या. यंदाची निवडणूक मात्र पंचरंगी होण्याची शक्‍यता आहे. शहर विकास आघाडी, नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान, भाजप आणि शिवसेना या चार पक्षात प्रमुख लढत असणार आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मंडळी देखील निवडणुकीत ताकदीने उभी राहणार आहेत.

शहर विकास आघाडीतून कोण ?

कणकवली नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षातून विलास कोरगावकर, स्वाभिमानमधून समीर नलावडे, भाजपमधून कन्हैया पारकर आणि शिवसेनेमधून सुशांत नाईक या नावांची जवळपास निश्‍चिती झाली आहे.  आता या उमेदवारांना शहर विकास आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी कोण निवडणूक लढविणार याची प्रतीक्षा आहे.  

कणकवलीच्या नव्या प्रभाग रचनेमध्ये सरासरी आठशे मतदारांचा एक प्रभाग आहे. यात तिरंगी किंवा पंचरंगी लढती झाल्या तरी ३०० ते ३५० मते असलेल्या उमेदवाराला विजयी होण्याची अधिक संधी आहे. त्यादृष्टीने आपल्या गटातील, पक्षातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना किती मते मिळतील, त्याचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला किती फायदा होईल. कुठल्या प्रभागात कोण प्रतिस्पर्धी असेल याची आकडेमोड नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांनी सुरू केली आहे. त्यासाठी आत्तापासूनच मतदारांची भेटी घेतल्या जात आहेत.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election