कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी फुटणार

कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी फुटणार

कणकवली - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २३) राज्यमंत्री रवींद्र चव्हाण करणार आहेत. त्यांच्या हस्ते कणकवली शहरातील विविध विकासकामांची उद्‌घाटने होतील. त्यानंतर भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन निवडणूक प्रचाराची रणनीती निश्‍चित होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. जठार यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, युवानेते संदेश पारकर उपस्थित होते.

जठार म्हणाले,‘‘कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होईल. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ते दुपारी तीन ते सहा या वेळेत भगवती मंगल कार्यालयात भाजप कार्यकारिणी बैठक घेणार आहेत. यात प्रचाराची रणनीतीही ठरणार आहे.’’

ते म्हणाले, कणकवली नगरपंचायतीला सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. नगरोत्थान मधून कोट्यवधीचा निधी शहरात आला. त्यातून झालेल्या कामांची उद्‌घाटने चव्हाण करणार आहेत. तर पुढील दीड वर्षात कणकवली शहराचा बॅकलॉग भरून निघेल एवढा निधी येणार आहे. शहरातील बांदकरवाडी येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या मंजूरीसाठी आम्हीच प्रयत्न केले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून भुयारी मार्गासाठी निधीही उपलब्ध करून दिल्याचे जठार यांनी सांगितले.

तेलींकडे सावंतवाडी...
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी समन्वयाने काम करणार आहेत. कणकवली नगरपंचायतीची जबाबदारी संदेश पारकर यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रदेश चिटणीस राजन तेली हे देखील प्रचारात सहभागी होतील. मात्र त्यांच्याकडे संपूर्ण सावंतवाडीची जबाबदारी असल्याचे जठार म्हणाले.

सर्व १७ जागांसाठी आग्रही...
कणकवलीत शतप्रतिशत भाजपसाठी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे नगराध्यक्षांसह सर्व १७ जागा स्वबळावर लढविण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. शुक्रवारी (ता.२३) होणाऱ्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत याबाबत तशी भूमिका मांडणार असल्याचेही जठार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com