कणकवली उपनगराध्यक्षांसाठी ‘हनी ट्रॅप’

कणकवली उपनगराध्यक्षांसाठी ‘हनी ट्रॅप’

कणकवली - राजकारणात मतभेद असू शकतात; पण ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून मला राजकीय आणि वैयक्‍तिक आयुष्यातून बाद करण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत सोशल मीडियातूनही बदनामी करण्यात आली. या ‘हनी ट्रॅप’चे सर्व पुरावे पोलिस प्रशासनाला दिले; परंतु माझ्या विरोधात खोडसाळ तक्रार नोंदविणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही, अशी माहिती येथील उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी येथे दिली.

श्री. पारकर म्हणाले, ‘‘माझे आजवरचे आयुष्य जनसेवेसाठीच दिले आहे. गेली अडीच वर्षे शहराला अपेक्षित काम करत असताना, मुंबईतून भाडोत्री महिला आणून मला अडकविण्याचे षड्‌यंत्र रचले गेले. माझ्या विरोधात खोटी तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून माझी सोशल मीडियातही बदनामी करण्यात आली. या सर्व प्रकरणामागे कुणाचा अदृश्‍य हात आहे, कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आले, याबाबतची सर्व माहिती पोलिस प्रशासनाला दिली; पण पोलिस प्रशासन आणि राज्याचे गृहराज्यमंत्री कुणाच्या तरी दबाखाली असल्याने ते या प्रकरणाचा तपास करीत नाहीत.’’

टीका नको, मार्गदर्शन करा...
गेली पंचवीस वर्षांहून अधिक कालावधीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकारणात अनेक पदे भूषवली आहेत. राजकारण, समाजकारण सर्वच क्षेत्रांत ते आता ज्येष्ठ आहेत. त्यांनी आता कुणावरही टीका करणे सोडून द्यावे आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असेही आवाहन श्री. पारकर यांनी केले.

राजकारणातून एखाद्याला संपविण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण कुणी करत असेल, तर चांगली माणसे राजकारणातच येणार नाहीत. आजवर सिंधुदुर्गच्या राजकारणात असे प्रकार घडलेले नाहीत. अशा घटना लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या आहेत. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनाने अशा गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही आवाहन श्री. पारकर यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतात. यातून घटकाभर विरंगुळा मिळतो; पण जनतेच्या विकासाची पायाभूत काम होत नाहीत. हे प्रकार लोकशाहीसाठी घातक आहेत. आम्ही गेल्या अडीच वर्षांत शहरातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. शहरवासीयांना पुरेसे पिण्याचे पाणी, सर्वच प्रभागांत पथदीप, गार्डन, चांगल्या दर्जाचे रस्ते दिले. पुढील काळात सांडपाणी, घनकचरा, पार्किंग आदी प्रश्‍नही मार्गी लावणार आहोत.’’

गुंडगिरी, दहशतीचे दुकान बंद होणार
सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर काहींची गुंडगिरी आणि दहशत सुरू आहे; मात्र गुंडगिरी आणि दहशतीचे हे दुकान यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीतून बंद होणार आहे. आम्ही ३६५ दिवस २४ तास जनसेवेसाठी देत आहोत. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. या पाठबळाच्या जोरावरच गुंडगिरीचे दुकान आम्ही बंद पाडणार आहोत, असे श्री. पारकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com