कणकवली सभापतीपदासाठी एकही अर्ज नाही 

कणकवली सभापतीपदासाठी एकही अर्ज नाही 

कणकवली -  येथील नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीसाठी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांकडून एकही अर्ज दाखल झालेला नाही. नलावडे गटाचा बहिष्कार आणि सूचक व अनुमोदक उपलब्ध होणार नसल्याने सभापती अर्ज भरताना सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण झाली. त्यामुळे विषय समित्यांचे गठण झाले तरी सभापती निवड होऊ शकली नाही. पुढील महिन्यात सभापतीपदासाठी पुन्हा निवडणूक लागण्याची शक्‍यता आहे. 

येथील नगरपंचायतीच्या सभापती निवडीसाठी प्रांताधिकारी नीता शिंदे-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, नंदिनी धुमाळे, सुशांत नाईक, राजश्री धुमाळे आणि प्रा. दिवाकर मुरकर उपस्थित होते. 

सभापती निवड प्रक्रियेच्या सुरवातीला चिठ्ठया काढून विषय समित्यांचे गठण झाले. यात कॉंग्रेसच्या नलावडे आणि पारकर गटाचे सदस्य प्रत्येक विषय समितीमध्ये निवडले गेले. दुपारी एक ते तीन या वेळेत समिती सभापतीसाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. परंतु या कालावधीत एकही अर्ज दाखल झाला नाही. नलावडे गटाने या निवडीवर बहिष्कार टाकल्याने या गटाचा एकही सदस्य नगरपंचायत बैठकीला उपस्थित नव्हता. 

सायंकाळी पाच वाजता सभापती निवड जाहीर केली जाणार होती. परंतु सभापतीपदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने सभापती निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आजच्या निवड प्रकियेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कालावधीत पुन्हा सभापतीपदासाठी निवडणूक होऊ शकते अशी माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. 

विषय समित्या अशा : 
आरोग्य, वीज, शिक्षण व क्रीडा समितीमध्ये सुशांत नाईक, कन्हैया पारकर, माया सांब्रेकर, समीर नलावडे आणि रूपेश नार्वेकर यांचा समावेश आहे. 
बांधकाम समितीमध्ये राजश्री धुमाळे, समीर नलावडे, सुमेधा अंधारी, अभिजित मुसळे आणि गौतम खुडकर यांचा समावेश आहे. 
महिला बालकल्याण समिती मध्ये स्नेहा नाईक, सुविधा साटम, सुमेधा अंधारी आणि मेघा गांगण यांचा समावेश आहे 
बाजार, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीचे पद्धसिद्ध सभापती हे उपनगराध्यक्ष असतात. त्यामुळे कन्हैया पारकर हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. तर इतर सदस्यांमध्ये सुमेधा अंधारी, किशोर राणे, माया सांब्रेकर, नंदिनी धुमाळे यांचा समावेश आहे. 

सदस्यांचा बहिष्कार 
विषय समिती सभापती निवडून येण्यासाठी उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक यांची आवश्‍यकता असते. कॉंग्रेसच्या नलावडे गटाचे दोन ते तीन सदस्य सर्वच समित्यांमध्ये आहेत. या सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तर पारकर गटाचे एक ते दोन सदस्य विषय समित्यांमध्ये आहेत. या सदस्यांना शिवसेना-भाजप तसेच कॉंग्रेसच्या नलावडे गटाकडून सूचक व अनुमोदक मिळण्याची शक्‍यता नव्हती. त्यामुळे सत्ताधारी पारकर गटानेही सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले नाहीत. 

सभागृहाचा निर्णय महत्वाचा 
पाणी पुरवठा वगळता इतर समित्यांचे सभापती निवडले गेले नाहीत. परिणामी नगरपंचायतीची स्थायी समिती अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे महत्वाचे सर्व निर्णय आता सभागृहातच घ्यावे लागणार आहेत. विकासकामांबाबत असे निर्णय घेताना सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com