कणकवली-आचरा पर्यायी रस्त्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कणकवली - गेली अनेक वर्षे रखडलेला कणकवली-आचरा रस्त्याला पर्यायी असणाऱ्या रस्त्याचे काम यंदापासून सुरू होणार आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

कणकवली - गेली अनेक वर्षे रखडलेला कणकवली-आचरा रस्त्याला पर्यायी असणाऱ्या रस्त्याचे काम यंदापासून सुरू होणार आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून अडीच कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. तर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी वरवडे आणि आशिये गावातून पर्यायी रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

कणकवली-आचरा मार्गावरील कणकवली ते कलमठ हद्दीमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होते. कणकवली आचरा रस्त्याला कलमठ, वरवडे, पिसेकामते, बिडवाडी, रामगड, आडवली, मालडी, श्रावण, बेळणे, पळसंब, चिंदर, त्रिंबक आदी अनेक गावे जोडली गेली आहेत. यात कणकवली शहर ते कलमठ हद्दीपर्यंतचा रस्ता कमी रुंदीचा असल्याने, तसेच या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असल्याने प्रत्येक मिनिटाला वाहतूक कोंडी होत असते.

या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी शहरातील हॉटेल सह्याद्री ते आशिये, कलमठ आणि वरवडे चव्हाण दुकान असा पर्यायी मार्ग काढण्यात आला. सन २००६ मध्ये या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली. तर शहरातील पटवर्धन चौक ते कलमठ हद्दीपर्यंतचा रस्ता ग्रामीण करण्यात आला. मागील अकरा वर्षे निधी अभावी या रस्त्याचे काम ठप्प झाले होते. तीन वर्षापूर्वी वरवडे गावातील प्रकल्पग्रस्तांना मोबदला वितरण करण्यात आले. तर सध्या आशिये गावातील ज्या खातेदारांच्या जमिनी या बायपास रस्त्यासाठी बाधित होत आहेत. त्यातील ९८ लोकांना २ कोटी ६० लाख रूपयांच्या मोबदला वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. आता कलमठ गावातील बायपास बाधितांना अडीच कोटींचा मोबदला देणे शिल्लक आहे. त्यासाठी आवश्‍यक निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

सद्यःस्थितीत वरवडे गावातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर पुढील महिन्याभरात आशिये गावच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर अडीच कोटींचा निधी मिळाल्यानंतर कलमठ गावातील बायपास बाधितांना मोबदला वितरण होणार आहे.

दहा मिटरचा रस्ता होणार
आचरा बायपास रस्त्याचे काम हायब्रीड ॲन्युइटी धोरणानुसार करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग १० मीटर रुंदीचा असणार आहे. तर प्रत्यक्षात रस्त्याचे भूसंपादन ३० मीटरनुसार करण्यात येणार आहे. कणकवली शहरातील ४०० मीटर जमीन रस्त्यात बाधित होणार आहे. मात्र, त्याचे भूसंपादन १२ मीटरनुसार करण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्ता कामाला प्रारंभ
आचरा बायपास रस्त्यामधील वरवडे आणि आशिये गावातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आल्याने, यंदा पावसाळ्यापूर्वी बायपास रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मुंबई येथील थ्री सर्कल या एजन्सीने या कामाचा ठेका घेतला आहे. 

Web Title: Sindhudurg News Kankavli- Achara Alternative road