कसीनो सिंधुदुर्गाच्या दारात

कसीनो सिंधुदुर्गाच्या दारात

गोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल असलेल्या कसीनोमुळे जुगार, वेश्‍या व्यवसाय, अमली पदार्थ अशा गैरकृत्यांना बळ मिळत असल्याचा आरोप गोव्यात होतो. दुसरीकडे सरकारच्या तिजोरीत त्यातून वर्षाला किमान २०० कोटींचा महसूल जमा होत असल्याने तो बंद करण्याचे धाडस दाखवता येत नाही. यामुळे हा सगळा कसीनोचा व्याप मोपा विमानतळ परिसरातील करमणूक क्षेत्रात हलविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. यामुळे येत्या काही काळात कसीनोबरोबरच कसीनो संस्कृती सिंधुदुर्गाच्या दरवाजात येऊन उभी ठाकणार आहे. 

कसीनोचा प्रारंभ
गोवा हे पर्यटन राज्य असल्याने त्याला पोषक गोष्टींचे तेथे कायमच स्वागत होते. यामध्ये अगदी मुक्त मद्य संस्कृतीचाही यात समावेश आहे. कसीनो हा त्याचाच भाग. २००७ मध्ये काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कसीनोला परवानगी दिली गेली. त्यातून हळूहळू कसीनोची संख्या वाढत जावून उलाढालही वाढली. मांडवी नदीत तब्बल सहा कसीनो अजस्त्र बोटींमध्ये विसावले आहे. शिवाय गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्येही कसीनो आहेत. त्याची संख्या १५ च्या घरात आहे. यामध्ये होणाऱ्या उलाढालीची गणती होत नसली तरी ती काही कोटींच्या घरात असल्याचे मानले जाते. 

कसीनो विश्‍व
 गोव्यात कसीनोला परवानगीचे वर्ष     २००७
 गोव्यातील कसीनोची संख्या     १५
 मांडवी नदीतील कसीनोची संख्या     ६
 कसीनोतून गोव्याचे करमणूक कर उत्पन्न     १६० कोटी
 कसीनोतून परवाना नूतनीकरण उत्पन्न     ६० कोटी
 गोव्यातील पर्यटक संख्या     ३० लाख
 मोपा विमानतळ पूर्णत्वाचे संभाव्य वर्ष     २०२०
 मोपामध्ये करमणूक पार्कसाठी आरक्षित क्षेत्र...    २५४ एकर

काय चालते कसीनोत?
कसीनोचे विश्‍व खूप वेगळे आहे. यात प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने गेमिंग चालते. हा एक प्रकारचा खूप मोठा जुगार आहे. यात खेळ, मौजमजा चालत असल्याचा दावा केला जातो. कसीनोमध्ये गेल्यानंतरचे विश्‍व खूप वेगळे असते. ठराविक प्रवेशमूल्य घेऊन यात प्रवेश दिला जातो. गोव्यात कसीनोबाबत आत्तापर्यंत अनेक आरोप झाले. त्यानुसार कसीनोमुळे अमली पदार्थ, वेश्‍या व्यवसाय, जुगाराला चालना मिळते. यामुळे मारामाऱ्याही होतात. गोव्यात गेल्या काही वर्षात पणजी आणि परिसरात एकाचवेळी गाड्यांमध्ये मोठ्या रकमा पकडल्याच्या घटना घडल्या; मात्र त्या कसीनोमध्ये जिंकल्याचे कारण दाखवले गेले. गोव्यातील काही सामाजिक संस्थांच्या आरोपानुसार नव्या ग्राहकाला प्रारंभी काही पैसे मिळतील असे पाहिले जाते. त्यामुळे जुगार खेळायला चालना मिळते.

सिंधुदुर्गावरील प्रभाव
कसीनोमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्यांची संख्या सध्याही मोठी आहे. ही सगळी संस्कृती जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळ येणार आहे. यामुळे जुगार व अन्य गोष्टींच्या नादी लागणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. असे असले तरी कसीनोमधून रोजगारनिर्मिती होण्याचे प्रमाणही मोठे आहे. शिवाय यातून अप्रत्यक्ष रोजगारसुद्धा निर्माण होणार आहेत. याचा फायदा सिंधुदुर्गला मिळू शकतो; मात्र कसीनो फायद्याचे की तोट्याचे हे ठरवणे आजच्या घडीला कठीण आहे.

नियंत्रण शून्य क्षेत्र
गोव्यात साधारण ३० लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. यातील अनेकजण कसीनोकडे आकर्षित होतात. गोवा सरकारला यातून करमणूक कर म्हणून साधारण १६० कोटी तर परवाना नूतनीकरणातून साधारण ६० कोटी असा २०० कोटीच्यावर महसूल मिळतो. मात्र कसीनोत किती आर्थिक उलाढाल होते याचे मोजमाप नाही. गोव्याने कसीनोला परवानगी दिली तरी त्यासाठी आवश्‍यक नियमावली बनविलेली नाही. शिवाय या क्षेत्राच्या नियंत्रणासाठी गेमींग कमिश्‍नर ही यंत्रणाच नाही. त्यामुळे कसीनोचे हे विश्‍व नियंत्रण शून्य आहे. 

गोव्यात येणारे बरेच पर्यटक कसीनोला भेट देतात. खास कसीनोसाठी गोव्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कसीनोत मनोरंजन, हॉटेलिंग, पर्यटनाचा आनंद घेण्याची व्यवस्था असते.
- जयदेव मोदी,
डेल्टा कार्पोरेशन

कसीनोमुळे काही प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. याचा थोडाफार फायदा बांदा परिसराला होईल; मात्र त्यामुळे येणाऱ्या वाईट गोष्टी आमच्या भागात पसरता नये. त्या दृष्टीने दक्षता घेतली गेली पाहिजे.
- मंदार कल्याणकर,
सरपंच, बांदा

कसीनोला विरोध झाला पण...
काँग्रेस सरकारने कसीनोला परवानगी दिल्यानंतर येथे वाईट संस्कृती आल्याचा आरोप सुरू झाला. यात भाजप आघाडीवर होते. २०१२ च्या निवडणुकीवेळी भाजपने पूर्ण ताकदीने सरकार आल्यास कसीनो मांडवी बाहेर फेकून देऊ, असे आश्‍वासन दिले होते. कसीनो विरोधात कॅन्डल मार्च काढला. योगायोगाने भाजप पूर्ण सत्तेत आला, मात्र ते कसीनो हटवायचा निर्णय घेऊ शकले नाहीत. याचे कारण म्हणजे यातून मिळणारा महसूल. 
कसीनो सुरू होण्याआधी २००५-६ मध्ये गोव्याचे करमणूक कराचे उत्पन्न ५.१८ कोटी होते. ते २०१५-१६ ला १६० कोटी इतके झाले. हे उत्पन्न दुसऱ्या ठिकाणाहून भरून काढणे कठीण होते. भाजपच्या या बदललेल्या भूमिकेविरोधात काँग्रेससह आम आदमी औरत अगेस्ट गॅम्बलिंग (आग) या संस्थांनी आवाज उठविला. २०१७ च्या निवडणुकीवेळीही हा मुद्‌दा चर्चेला आला. त्यावेळी भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांनी कसीनो बंद 
करता येणार नाहीत; मात्र ते पणजी परिसरातून हटविण्याचे धोरण अमलात आणले जाईल असे जाहीर केले. तेव्हापासून कसीनो अन्यत्र स्थलांतराबाबत हालचाली सुरू झाल्या. 

मोपाचा पर्याय
सिंधुदुर्गाच्या सीमेवरील बांद्यापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटरवर मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नागरी हवाई उड्डानमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे २०२० पर्यंत विमान उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. येथे करमणूक पार्कसाठी २५४ एकर जागा आरक्षीत आहे. फेब्रुवारीमध्ये गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. यात गोवा सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री म्हणून ओळख असलेली सार्वजनिक बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी राज्यपालांच्या अधिभाषणावर बोलताना प्रस्तावित विमानतळाच्या करमणूक क्षेत्रात कसीनो हटवू असे जाहीर केले आहे. त्यामुळे कसीनो मोपात स्थलांतरित होणार हे निश्‍चित झाले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रभू यांचाही दौरा झाला. त्यांनी मोपातील उर्वरित क्षेत्र करमणूक पार्कसाठी वापरण्याची सूचना केली. यामुळे येत्या काळात कसीनो सिंधुदुर्गाच्या दरवाजात येऊन ठेपणार हे जवळपास निश्‍चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com