केर भेकुर्ली ग्रामपंचायत बिनविरोध

केर भेकुर्ली ग्रामपंचायत बिनविरोध

दोडामार्ग - केर भेकुर्ली (ता. दोडामार्ग) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा ६५ वर्षांनंतर यंदाही कायम राखण्यात यश आले आहे. भेकुर्लीवासीयांनी थेट जनतेतून निवडून येणारा सरपंचही बिनविरोध निवडून देत राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्‍टोबरला मतदान होते; पण गावकऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच सोमवारी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली.

गेली दहा वर्षे सरपंच, उपसरपंचपद भूषवून गावाला आदर्श गावाच्या पंक्तीत बसविण्यासाठी झटणाऱ्या प्रेमानंद देसाई यांनी निवडणुकीपासून दूर राहात राजकारणापासून अलिप्त अशा नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ग्रामपंचायतीवर कुठल्याच राजकीय पक्षाचा दावा असणार नाही. आदर्श गाव विकास पॅनेलचीच ग्रामपंचायत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सत्तेची धुंदी अनेकांना वेडीपिसी करते. खालच्या पातळीवरचे राजकारण होते. ग्रामपंचायत निवडणुकीतही रक्ताच्या नात्यांमध्येही कलह निर्माण केला जातो. गावपातळीवरच्या त्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्यातरी सत्ता, पैसा आणि मसल पॉवरच्या जोरावर राजकारणी नको तितका हस्तक्षेप करून गावातील शांतता आणि सलोखा बिघडवून टाकतात. त्यावर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून शांतता, सलोखा, नातेसंबंध सुस्थितीत ठेवून गावविकासाचा गाडा सर्वसंमत्तीने हाकणे, हा चांगला पर्याय असतो. पण अनेक राजकीय पुढाऱ्यांची ईर्षा आणि इगो त्या आड येतो. जेथे पिढ्यान्‌पिढ्या शांतता नांदली ती गावे अंतर्गत वैमनस्याने धुमसत राहतात. बहुतेक ठिकाणी अशी स्थिती असताना केर भेकुर्लीवासीयांनी आपली ग्रामपंचायत बिनविरोध करून संधीसाधू राजकारण्यांना चपराक दिली आहे. 

केर येथील चव्हाटा मंदिरात गाव बैठक झाली. त्यात एकमुखी निर्णय होऊन सरपंच, उपसरपंच, सदस्यांची निवड झाली. यंदापासून सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. साहजिकच प्रत्येक गावात रस्सीखेच आहे. अशा स्थितीत केर भेकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून येणे नक्कीच कौतुकास्पद आहे.

केर भेकुर्ली कार्यकारिणी - 
सरपंच - मीनल मोहन देसाई, उपसरपंच - महादेव भिकाजी देसाई, सदस्य - लक्ष्मण बयो लांबर, वैष्णवी विश्‍वनाथ खानोलकर, गौतमी गंगाराम देसाई, रुक्‍मिणी मुकुंद नाईक, जगन्नाथ शंकर देसाई, पूनम बाळकृष्ण देसाई. 

प्रेमानंद देसाई यांचा सत्तात्याग
ग्रामपंचायतीने प्रेमानंद देसाई यांच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या काळात जवळपास सतरा पुरस्कार पटकावले. लाखो रुपयांची बक्षिसे मिळविली आहेत. यावेळी त्यांनी केर भेकुर्ली गावाचा आदर्श गाव असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. गावाने आदर्शवत काम वेळोवेळी केले आहे. या सर्व वाटचालीत जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची साथ मिळाली. गावानेही एकोपा राखत विकासासाठी साथ दिली. त्याबद्दल सरपंच श्री. देसाई यांनी सर्वाचे आभार मानले आणि यापुढेही गावविकासासाठी नवा डाव मांडणाऱ्या सगळ्या नव्या गड्यांना सर्वतोपरी साथ मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com