कोकम, वेंगुर्ले काजूचे ग्लोबल मार्केटिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

सावंतवाडी - केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेल्या उत्पादनांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. सिंधुदुर्गातील कोकम आणि वेंगुर्ले काजू या दोन्ही उत्पादनांना यामुळे जागतिक बाजारपेठेतील महत्त्व वाढविण्यासाठीचे क्षेत्र खुले झाले आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी वॉर रूम उभारण्याची योजना आखली आहे.

सावंतवाडी - केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेल्या उत्पादनांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. सिंधुदुर्गातील कोकम आणि वेंगुर्ले काजू या दोन्ही उत्पादनांना यामुळे जागतिक बाजारपेठेतील महत्त्व वाढविण्यासाठीचे क्षेत्र खुले झाले आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी वॉर रूम उभारण्याची योजना आखली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री प्रभू यांनी ज्या उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी काम सुरू केले आहे. अनेक देश थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमाच्या सरलीकरणानंतर गुंतवणूक संधीसाठी भारताकडे पाहत आहेत. याचाच विचार करून जीआय मानांकन प्राप्त उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची योजना वाणिज्य मंत्रालयाने आखली आहे.

जीआय मानांकनाचे फायदे

  •  मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण
  •  नोंदणीकृत उत्पादकांशिवाय जीआय मानांकनाच्या अनधिकृत वापराला पायबंद
  •  मानांकन प्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षण
  •  उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना
  •  जागतिक व्यापार संघटनेच्या इतर सदस्य देशांमध्ये उत्पादनास कायदेशीर संरक्षण मिळण्यासाठी पोषक स्थिती.

सिंधुदुर्गातील कोकम आणि वेंगुर्ले काजू या दोन उत्पादनांना याआधी भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. हापूसच्या मानांकनासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकम ही सिंधुदुर्गाची वेगळी ओळख आहे. यावर प्रक्रिया करून अनेक उत्पादने घेतली जातात; मात्र त्याला अपेक्षित परदेशी बाजारपेठ खुली झालेली नाही. वेंगुर्ले काजू या पिकानेही चवीच्या बाबतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यालाही या नव्या धोरणाचा फायदा होणार आहे.

उत्पादनांवर जीआय टॅग, गुंतवणुकीसाठी वॉर रूम याच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठीची मोहीम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. बनारसी साडीसारख्या एखाद्या विशिष्ट जागेसह ओळखल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी जीआय देण्याची मोहीमही सुरू केली आहे. एकदा अशी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आल्यानंतर स्थानिक कारागिरांना महत्त्व प्राप्त होईल. सर्व राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे काम करणार आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या जाणून घेण्याची योजनाही आखली जात आहे.
- सुरेश प्रभू,
 केंद्रीय वाणिज्यमंत्री

श्री. प्रभू म्हणाले, ‘‘भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित व्यवसाय गावागावात उभे राहावे व गाव आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत समृद्धी पोचावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचाच विचार करून हे धोरण आखले आहे. भौगोलिक मानांकनामुळे त्या प्रदेशाकडून किंवा त्याच्या ब्रॅंडमधून गुणवत्तेचे व विशिष्टतेचे आश्‍वासन दिले जाते. ते मूलतः त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावर आधारित असते. यातून सर्वत्र विकासाची संधी अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्याचा जीडीपी ३ टक्‍क्‍यांनी वाढणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास भारताच्या एकूण जीडीपीमध्ये वाढ होणार आहे.’’

लाकडी खेळण्यांना ‘जीआय’साठी प्रयत्न हवेत
केवळ कृषी नाही तर एखाद्या भागाचे वैशिष्ट असलेल्या इतर उत्पादनांसाठीही जीआय मानांकन घेता येते. सिंधुदुर्गात सावंतवाडीची लाकडी खेळणी, सुरंगी अशा काही उत्पादनांसाठी जीआय मानांकन घेण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. तसे झाल्यास या उत्पादनांना खऱ्या अर्थाने जागतिक बाजारपेठ खुली होणार आहे. कायदेशीररीत्या स्थापन कोणतीही संस्था, संघटना, अधिकारी यंत्रणा किंवा कोणत्याही उत्पादकांपैकी कुणीही जीआय नोंदणीसाठीची प्रक्रिया करु शकतात.

Web Title: Sindhudurg News Kokam, Vengurle cashew Global Marketing