...तर कोकण रेल्वेवर धावली असती सुपरफास्ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गाने देशातील सर्वाधिक वेगवान ट्रेन चालविण्याचे स्वप्न तब्बल १४ वर्षापूर्वी पाहिले होते. १६० किलोमीटर वेगाचे हे स्वप्न दिल्लीश्‍वराची परवानगी न मिळाल्याने पूर्ण होऊ शकले नव्हते. बुलेट ट्रेनच्या निमित्ताने याच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गाने देशातील सर्वाधिक वेगवान ट्रेन चालविण्याचे स्वप्न तब्बल १४ वर्षापूर्वी पाहिले होते. १६० किलोमीटर वेगाचे हे स्वप्न दिल्लीश्‍वराची परवानगी न मिळाल्याने पूर्ण होऊ शकले नव्हते. बुलेट ट्रेनच्या निमित्ताने याच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

मोदी सरकारने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा बोलबाला गेले काही दिवस आहे; मात्र कोकण रेल्वेने अति वेगवान गाडीचे स्वप्न तब्बल १४ वर्षापूर्वी पाहिले होते. या मार्गाची रचना १६० किलोमीटर वेगाने गाडी धावू शकेल अशी केली आहे. निष्णात अभियंता श्रीधरन यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला कोकणरेल्वेचा ट्रॅक आजही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उभारणीसाठी प्रसिद्ध आहे. २००३ मध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बी. राजाराम यांनी या मार्गावरून १६० किलोमीटर वेगाने अति वेगवान गाडी चालविण्याचे नियोजन केले होते. ही गाडी देशात सर्वाधिक वेगवान गाडी ठरली होती.

आजही भारतीय रेल्वे जास्तीतजास्त १३० किलोमीटर प्रति तास इतक्‍या वेगाने चालते. कोकण रेल्वे मार्गावर साधारण १२० ते १३० इतक्‍या वेगाने गाड्या चालतात. राजाराम यांनी अति वेगवान गाडीसाठीचा प्रस्ताव दिल्लीला पाठविला. त्यानंतर या मार्गावरुन १६० किलोमीटर वेगाची चाचणीही घेतली. ती यशस्वी झाली; मात्र पुढच्या काही दिवसात कोकण रेल्वे मार्गावर बेर्ले (वैभववाडी) येथे मोठा अपघात झाला.

नैसर्गिक आपत्तीमुळे हा अपघात झाला होता. यानंतर अति वेगवान गाडी रेल्वेबोर्डाची परवानगी मिळाली नाही. अर्थात कोकण रेल्वेचा ट्रॅक १६० किलोमीटर वेगाने गाडी पळविण्यासाठी पूर्ण सक्षम होता; मात्र इतक्‍या वेगाने गाडी चालविण्यासाठी रेल्वेमार्गाच्या दुतर्फा भक्कम कुंपणाची गरज असते, शिवाय कोकणातील अति पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती असते. ही कारणे प्रामुुख्याने प्रस्ताव नाकारण्यासाठी पुढे आली. 

अर्थात यातील काही गोष्टींची पूर्तता करणे शक्‍य होते; मात्र दिल्लीश्‍वराने कोकण रेल्वेला फारशी बाजू मांडण्याची संधी दिली नव्हती. त्या काळात १६० किलोमीटर वेगाने गाडी चालविण्याचा उपक्रम यशस्वी झाला असता तर गोवा आणि मुंबई यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले असते. 

नफ्याच्या विचाराने वेग पडला मागे
बुलेट ट्रेनच्या निमित्ताने कोकण रेल्वेच्या या स्मृती पुन्हा जाग्याझाल्या आहेत. नंतरच्या काळात कोकण रेल्वेची धुरा सांभाळलेली बहुसंख्य व्यवस्थापकीय संचालक महामंडळाला जास्तीत जास्त नफ्यात आणण्याच्या मागे लागले. त्यामुळे वेगाचा विचार फारसा झाला नाही.

Web Title: Sindhudurg News Konkan railway