कोकण रेल्वे तीन वर्षांत विजेवर धावणार

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 18 जानेवारी 2018

उडुपी - कोकणरेल्वे येत्या तीन वर्षांत विजेवर धावणार आहे. रेल्वे विद्युतीकरणाचे काम दृष्टिपथात आले आहे. याशिवाय नव्या स्थानकांच्या निर्मितीमुळे कोकण रेल्वेची वाहतूक आणखी ५० टक्‍क्‍यांनी वाढविण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

उडुपी - कोकणरेल्वे येत्या तीन वर्षांत विजेवर धावणार आहे. रेल्वे विद्युतीकरणाचे काम दृष्टिपथात आले आहे. याशिवाय नव्या स्थानकांच्या निर्मितीमुळे कोकण रेल्वेची वाहतूक आणखी ५० टक्‍क्‍यांनी वाढविण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

रेल्वेमंत्रिपदी सुरेश प्रभू विराजमान झाल्यानंतर कोकण रेल्वेचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाच्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या. यासाठी काही प्रमाणात निधीही मंजूर झाला; मात्र श्री. प्रभू यांचे रेल्वेमंत्रिपद गेल्यानंतर या प्रकल्पांचे भवितव्य काय, असा प्रश्‍न उपस्थित होत होता; मात्र विद्यमान रेल्वेमंत्री पियुश गोयल यांनी प्रभू यांनी जाहीर केलेल्या या योजना तितक्‍याच वेगाने पुढे चालू ठेवल्या आहेत.

कोकण रेल्वेने या प्रकल्पांच्या स्थितीबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकारांचा कर्नाटक दौरा आजपासून आयोजित केला. या वेळी रेल्वे विद्युतीकरणाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असे रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रानी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात विद्युतीकरणाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर रोहा ते ठोखूर या कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम एलएनटी आणि कल्पतरू या दोन कंपन्यांना देण्यात आले.

सध्या या मार्गावर वीज खांब उभारण्यासाठीचे पाया बनवण्याचे काम सुरू आहे. पुढच्या टप्प्यात यावर खांब उभारून विद्युतीकरणासाठीची यंत्रणा उभारली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या नफ्यातही वाढ होणार आहे. याशिवाय पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश येणार आहे. प्रकल्पाची पूर्तता आता दृष्टिपथात आली आहे.

दुपदरीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम रोहा ते वीरदरम्यान सुरू आहे; मात्र या पुढील मार्गावर दहा वेगवेगळ्या ठिकाणी नवीन स्थानके उभारण्यात येत आहे. या प्रत्येक ठिकाणी लुपलाईन उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे गाड्यांना क्रॉसिंगची व्यवस्था करणारी आणखी दहा स्थानके सज्ज होतील. कोकण रेल्वे मार्गावर सात ते दहा किलोमीटरदरम्यान किमान १ क्रॉसिंगसाठीचे स्टेशन उपलब्ध होईल असे नियोजन आहे. यामुळे रेल्वेमार्गावरील क्रॉसिंगला वाया जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करता येणार आहे. यामुळे या मार्गावर आणखी गाड्या सुरू करता येणार आहेत. याबरोबरच टप्प्याटप्प्याने दुपदरीकरणही चालू राहणार आहे. यामुळे या दोन गोष्टीमुळे कोकण रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे.

५० टक्‍क्‍यांनी वाहतूक वाढण्याची अपेक्षा
कोकण रेल्वे मार्गावर रोज सुमारे चाळीस गाड्या धावतात. दहा नवीन स्थानके उभारल्यानंतर ही वाहतूक ५० टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्या इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कळबणी, कडवई, वेरवली, खारेपाटण, आर्चिर्णे, मिर्जान, इनैजे या ठिकाणी नव्या स्थानकांचे काम सुरू आहे. यात काही हॉल्ट स्टेशन तर काही नियमित स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांमुळे नवी गावे विकासाच्या टप्प्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे रेल्वे मार्गाच्या क्षमतेमध्ये वृद्धी होईल.

Web Title: Sindhudurg News Konkan Railway electrification