गणेशोत्सवासाठीच्या कोकण रेल्वेच्या जादा गाड्या फुल्ल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

कणकवली - गणेशोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर यंदा तब्बल 183 फेऱ्या सोडण्यात येणार आहेत; मात्र या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनारक्षित गाडी सोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व जादा गाड्यांना दोन जादा बोगी लावल्या जातील, असे जाहीर केले आहे. 

गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो प्रवासी मुंबईतून दाखल होतात. गणेशोत्सव कालावधीत नियमित गाड्यांची वेटिंग लिस्ट 500 च्या पुढे गेल्याने जादा गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. यानुसार मुंबई, पुणे, अहमदाबाद येथून कोकण रेल्वे मार्गावर 183 जादा फेऱ्या सोडण्याची घोषणा झाली; मात्र या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

नियमित आणि जादा गाड्यांमध्ये केवळ दोनच बोगी अनारक्षित ठेवल्या होत्या. त्यामुळे जादा गाड्या सोडूनही प्रवाशांना अपेक्षित फायदा मिळत नव्हता. त्यामुळे आता अनारक्षित बोगींची संख्या दोनने वाढविली आहे. दोन बोगी वाढवूनही प्रवाशांना फारसा दिलासा मिळणार नाही. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक दिवशी किमान एक तर अनारक्षित बोगी असलेली गाडी सोडावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. 

यंदा पनवेल ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम हाती घेतले आहे. त्यामुळे महामार्ग खड्डेमय झाला आहे. या खडतर प्रवासाचे दिव्य पार पाडण्यापेक्षा चाकरमान्यांनी रेल्वे प्रवासालाच अधिक पसंती दिली आहे; मात्र रेल्वेचीही वेटिंग तिकिटे मिळत असल्याने चाकरमान्यांतून नाराजी आहे. 

रेल्वेच्या जादा रेल्वे गाड्यामध्ये वेटिंगची तिकिटे मिळत नाहीत. जनरल तिकीट धारकांना आरक्षित डब्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर दररोज किमान एक ते दोन अनारक्षित गाड्या सोडल्या, तरच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
- मोहन केळुसकर,
अध्यक्ष, कोकण विकास आघाडी 

Web Title: sindhudurg news konkan railway special train for Ganshoushav