कोरेगाव भीमा प्रकरणी बहुजनांची निषेध रॅली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

सावंतवाडी - कोरेगाव भीमा दंगलीचा निषेध करण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निषेध कृती समितीतर्फे  निषेध रॅली काढण्यात आली. बहुजन समाजातील शिष्टमंडळाने प्रांत सुशांत खांडेकर यांना निवेदन दिले.

सावंतवाडी - कोरेगाव भीमा दंगलीचा निषेध करण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निषेध कृती समितीतर्फे  निषेध रॅली काढण्यात आली. बहुजन समाजातील शिष्टमंडळाने प्रांत सुशांत खांडेकर यांना निवेदन दिले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ॲड. अनिल निरवडेकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, ॲड संदीप निंबाळकर, बाळासाहेब बोर्डेकर, प्रसाद पावसकर, रमेश बोंद्रे, अंकुश जाधव, विजय चव्हाण, पी. बी. चव्हाण, संजय देसाई, मोहन जाधव, निखिल प्राजक्ते, सुदीप कांबळे, संदीप कदम, गुंडू जाधव, वासुदेव जाधव, सत्यवान जाधव आदी उपस्थित होते.
महेश परुळेकर म्हणाले, ‘‘पालकमंत्री दीपक केसरकर संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे समर्थन करून बहुजनांत फूट पाडत आहेत; मात्र हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. अराजकता, न्यायव्यवस्थेतील बेबनाव जनतेसमोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलणे अशा लोकांसाठी अशक्‍य आहे. महात्मा गांधीजींची हत्या केली व आता त्यांची मंदिरे बांधण्याची भाषा करता आहात. त्यांना डॉ. बाबासाहेब कळलेलेच नाहीत.’’

डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणला जातो. लोकशाही धोक्‍यात असल्याचे न्यायाधीश सांगत आहेत, हे भयानक सत्य आहे. आज नागपुरातून दिल्ली हलवली जाते. हेच बहुजन २०१८ ला दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर अशी काही लाठी चालवेल की भाजपशाहीच नष्ट होईल.’’
गोव्याचे निखिल प्राजक्ते म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा घटनेचा साक्षीदार आहे. गोवा समाजाच्यावतीने गेलो होतो. ती अमानुष घटना होती. जातीयवादी शक्तीचा तीव्र निषेध करायला हवा. ब्राह्मणशाही मोडीत काढण्यासाठी बहुजन समाजाने जागृत होणे आवश्‍यक आहे.’’

प्रवीण भोसले यांनी भाजप व शिवसेनेला टार्गेट करीत या सरकारला कोरेगाव भीमा घटनेबाबत पूर्वकल्पना होती. त्यांनी पुरेसे पोलिस संरक्षण दिले नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा भीमशक्तीच्या मागे राहिलेला आहे. यापुढे अन्याय होता कामा नये. भिडे व एकबोटे यांचा निषेध आम्ही करतो. रिपब्लिकनचे रामदास आठवले यांनी यात सहभाग घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

डॉ. चिंडक यांनी कोरेगाव भीमाची घटना व्यथित करणारी असल्याचे सांगत माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘कोरेगाव भीमाची छायाचित्रे पाहिली; परंतु मुंबई बंदची छायाचित्रे दिसली नाहीत. नारीशक्तीने आता अशा लढ्यात सहभागी व्हावे.’’

ॲड. निंबाळकर म्हणाले, ‘‘मनुवाद्यांनी संभाजी महाराजांपासून गडकऱ्यांपर्यंत सर्वांना बदनाम केले. भिडे नेहरू व गांधी यांना शिव्या घालतात. ते समानता नष्ट करून मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुजन समाजाची एकी पाहून ही मंडळी त्यांच्यात फूट पाडण्याचे काम करत आहेत.’’ संदीप कदम यांनी हा मोर्चा मनुवादी विरोधासाठी आहे. भिडे व एकबोटे यांना वाचविण्याचा प्रयत्न गृह राज्यमंत्री करीत आहेत. हिंदू राष्ट्र करण्याची घोषणा करणारे प्रमोद मुतालिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

...तर केसरकरांचा सत्कार करू
जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव यांनी जातीयवादी शक्तीविरोधात वज्रमूठ करावी, असे आवाहन केले. गृह राज्यमंत्री केसरकर यांनी भिडे, एकबोटे यांना अटक करून दाखविल्यास बहुजन समाज त्यांचा भव्य सत्कार करेल, असे सांगितले.

Web Title: Sindhudurg News KoreganBhima riots agitation rally