कुणकेरी हुडोत्सव उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

सावंतवाडी - कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. शंभर फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा करत भाविकांनी या उत्सवाची अनुभूती घेतली.

सावंतवाडी - कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. शंभर फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा करत भाविकांनी या उत्सवाची अनुभूती घेतली. कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हुडोत्सव तालुक्‍यास जिल्ह्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो.

कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध धार्मिकतेत मानाचा असतो. आज प्रथेप्रमाणे या हुडोत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांनी गर्दी केली होती. कोलगाव, कुणकेरी गावाची निशाण हुड्याच्या ठिकाणी सायंकाळी सहाच्या दाखल झाली. या वेळी तिन्ही अवसार प्रसाद उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढू लागले.

या वेळी पाचवेळा जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारावर दगड मारण्यात आले. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थिती होते. सायंकाळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. घोडेमोडणी, वाघाचा खेळ, पारंपरिक पाथर (धनगरणीचा दगड) उचलण्याचे पारंपरिक खेळही यावेळी पार पडले.

या हुडोत्सवाचे आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे रोंबाटासह हुड्याजवळ आल्यानंतर घोडेमोडणी, वाघाची शिकार हे. याला भाविकांनी मोठी पसंती दिली. महिला वर्गही या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता.

Web Title: Sindhudurg News Kunkeri hudoushav celebrated