सोनुर्लीत अमली पदार्थांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

सावंतवाडी - तालुक्‍यातील सोनुर्ली पोटये कुंभेवाडी येथे अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या छाप्यात पाच जीवंत काडतुसेही सापडली. पोलिसांनी लक्ष्मण बापू सावंत (वय ४०) याला ताब्यात घेतले. ही कारवाई बांदा पोलिसांनी केली.

सावंतवाडी - तालुक्‍यातील सोनुर्ली पोटये कुंभेवाडी येथे अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या छाप्यात पाच जीवंत काडतुसेही सापडली. पोलिसांनी लक्ष्मण बापू सावंत (वय ४०) याला ताब्यात घेतले. ही कारवाई बांदा पोलिसांनी केली.

शहरात गांजा पार्टी उद्‌ध्वस्त केल्याची बातमी ताजी असतानाच आज सोनुर्ली येथे ही कारवाई करण्यात आली. बांदा पोलिसांना सोनुर्ली पोटये कुंभेवाडी येथे लक्ष्मण सावंत हे अमली पदार्थ बाळगत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार बांदा पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलिस कर्मचारी जगदीश दुधवडकर, हेमंत पेडणेकर, सुधीर कदम यांनी सोनुर्ली येथील लक्ष्मण सावंत यांच्या घरी शोध सुरू केला. यात त्यांना पांढऱ्या पिशवीमध्ये एकूण ३८ ग्रॅमची संशयास्पद पावडर, १० पांढऱ्या गोळ्या सापडल्या. हिरव्या कापडात गुंडाळलेली ठासणीची बंदूक व ५ जीवंत काडतुसे सापडली. यावेळी लक्ष्मण हा घरात नसून घराशेजारी असलेल्या मांगरात होता. बांदा पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सावंत याला ताब्यात घेतले. पांढऱ्या रंगाच्या पावडरीचे नमुने कोल्हापूर येथे पाठविणार असल्याचे निरीक्षक कळेकर यांनी सांगितले.

सावंत याला येथील पोलिसांच्या ताब्यात दिले असून, यापुढील तपास येथील पोलिसांकडून करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच येथील पालिकेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी शहरातील स्थानिकांसह गांजा पार्टी उद्‌ध्व्‌स्त केली होती. त्यामुळे अमली पदार्थांची पाळेमुळे मोठ्या शहरानंतर थेट सावंतवाडी सारख्या छोट्या शहरापर्यंत पोचल्याचे पुढे आले होते. अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्यांना गजाआड करण्याची मागणी जोर धरत आहे. बांदा पोलिस थेट सोनुर्लीपर्यंत पोचल्यामुळे येथील पोलिसांच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Web Title: Sindhudurg News laudanum Seized in Sonurli