सावंतवाडीत बिबट्या आला रे आला... पळा पळा ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सावंतवाडी - "बिबट्या आला रे आला, पळा पळा...' च्या आवाहनानंतर झालेली पळापळ आणि उडालेली घाबरगुंडी, गडबड याची प्रचिती आज येथील सावंतवाडीकरांना आली.

सावंतवाडी - "बिबट्या आला रे आला, पळा पळा...' च्या आवाहनानंतर झालेली पळापळ आणि उडालेली घाबरगुंडी, गडबड याची प्रचिती आज येथील सावंतवाडीकरांना आली. येथील एका निवासी संकुलात बिबट्या घुसल्याचा दूरध्वनी आल्याने तत्काळ पोलिस आणि वनविभागाची टिम तेथे दाखल झाली; मात्र प्रत्यक्षात तो बिबट्या नसून धुवून सुकत ठेवलेला खेळण्यातील बिबट्या असल्याचे लक्षात आले. मात्र या धावपळीत वनविभाग आणि पोलिसांची मात्र दमछाक झाली. 

येथील पोस्ट ऑफिस शेजारी हरिहर कॉम्प्लेक्‍सच्या बिल्डींगवर तेथील एका रहिवाश्‍याने खेळण्यातील बिबट्या धुवून सुकवत टाकला होता. आपल्या सदनिकेच्या गॅलरीतील पत्र्यावर तो ठेवला होता. लांबून तो खरा बिबट्या असल्यासारखे वाटत होते. एका व्यक्तीला तो खरोखरच बिबट्या असल्याचा आभास झाला. त्याने ताबडतोब पोलिस, वनविभाग, प्रातांधिकारी यांना फोनवरुन या घटनेची माहिती दिली. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. या वेळी 7 ते 8 जण मिळून ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. यात सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल रमेश कांबळी, वनपाल श्री. धुरी, ओटवणे वनसमितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर गावकर, माजगाव वनपाल श्री. मोरे, पुंडलिक गावडे, पोलिस प्रशासन व काही ग्रामस्थ दाखल झाले.

या वेळी वनविभागाने सोबत पिंजराही घेतला होता. मात्र घटनास्थळी पोचून खात्री केल्यावर तो बिबट्या नसल्याचे सर्वाच्या लक्षात आले. यात पोलिस प्रशासन व वनविभाग आपल्या यंत्रणेसह वेळीच पोचल्यामुळे समाधान मानण्यात आले; मात्र या घटनेमुळे सर्वांचीच पुरती दमछाक झाली. सत्य समोर आल्यावर सर्वच उपस्थितांच्या हसून हसून पोटात गोळा आला. या वेळी नागरिकांचीही गर्दी झाली होती. वनविभागासाठी ही एक प्रकारे मॉकड्रीलच ठरली. खात्री न करता कळविणाऱ्या त्या नागरिकाच्या अतिउत्साहीपणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. या वर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी घटना खरोखरची असो किंवा मॉकड्रील असो आपली यंत्रणा परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असल्याची यानिमित्तान खात्री पटल्याचे सांगितले. 
 

Web Title: Sindhudurg News leopard in Sawantwadi