माळगाव-बागायतीत बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मालवण - माळगाव-बागायत येथील शेतकरी अभिमन्यू धामापूरकर यांच्या राहत्या घरानजीक असणाऱ्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करत तेथील वासरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बिबट्यांचा वस्तीकडील वावर वाढू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

मालवण - माळगाव-बागायत येथील शेतकरी अभिमन्यू धामापूरकर यांच्या राहत्या घरानजीक असणाऱ्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करत तेथील वासरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बिबट्यांचा वस्तीकडील वावर वाढू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

गेले काही महिने बागायत भोगलेवाडी परिसरात जंगलमय भागात तीन बिबट्यांचा संचार वाढला असल्याचे दिसून येत आहे. या बिबट्यांना अनेक ग्रामस्थांनीही पाहिले आहे. यातील एक बिबट्या शनिवारी मध्यरात्री धामापूरकर हे व्हरांड्यात झोपलेले असताना त्यांना गोठ्यात वासराची व बिबट्याची झटापट ऐकू आली. गोठ्यातील गायीने ओरडून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर बिबट्याने वासरावर हल्ला करून तिच्या मानेस पकडले.

या वेळी धामापूरकर यांनी आपला मुलगा प्रवीण व सून प्रज्ञा यांना गोठ्यात झालेल्या झटापटीची माहिती दिली. त्यांचे शेजारी स्वप्नील धामापूरकर, सचिन धामापूरकर, नाना धामापूरकर, हनुमंत फणसेकर, दत्ताराम मालवणकर यांनी आरडाओरड ऐकून धामापूरकर यांच्या घराकडे धाव घेतली. या वेळी ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्याने वासराला रक्तबंबाळ करून बागायत सडा परिसरातील जंगलमय भागात पळ काढला.

गोठ्यापासून जवळच असलेल्या घरातील व्हरांड्यात गायीचे दुसरे वासरू व स्वतः धामापूरकर झोपले असताना त्यांच्यापासून २० फूट अंतरावरील गोठ्यापर्यत बिबट्याने मजल मारल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धामापूरकर यांचा गोठा पक्का बांधलेला असून चारही बाजूला जाळे लावलेले असतानाही बिबट्याने जाळे तोडून गोठ्यात प्रवेश केला. 
या घटनेची माहिती प्रवीण धामापूरकर यांनी वनपाल विश्वास यांना दिल्यावर वनकर्मचारी पांचाळ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

या वेळी पोलिसपाटील किशोर जाधव, सरपंच नीलेश खोत, तातू भोगले, सुरेश रावराणे, बाबूराव भोगले आदी उपस्थित होते. कायद्याच्या चौकटीत राहून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन वनकर्मचारी पांचाळ यांनी ग्रामस्थांना दिले. या परिसरातील बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Sindhudurg News leopard seen in malgaon