लेप्टो सिंधुदुर्गातील 25 गावांत पोचला, 33 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

कणकवली - जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीस तापसरीने थैमान घातले आहे. आतापर्यंत 25 गावांत लेप्टो पोचला असून, 33 रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सक्षमपणे कार्यरत आहे. जिल्ह्यासाठी फिजिशियनचे पथक लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज येथे दिली.

कणकवली - जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीस तापसरीने थैमान घातले आहे. आतापर्यंत 25 गावांत लेप्टो पोचला असून, 33 रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सक्षमपणे कार्यरत आहे. जिल्ह्यासाठी फिजिशियनचे पथक लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज येथे दिली. 

जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीससदृश तापसरीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कणकवली, सावंतवाडी व कुडाळ येथे लेप्टोचे रुग्ण आढळल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. आतापर्यंत 25 गावांत लेप्टो पोचला असून, 33 रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा ऍलर्ट झाली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, ""जिल्ह्यात जवळपास 25 गावांत लेप्टोस्पायरोसीससदृश तापसरी सुरू आहे. काही ठिकाणी यात वाढही होत आहे. जे रुग्ण शासकीय रुग्णालयात येत आहेत, त्यांच्यावर स्पॉट टेस्ट केल्या जात आहेत. लेप्टो पॉझिटिव्ह आढळल्यास पेनिसीलीन देत आहोत. जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या साथीबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात रुग्ण उपचारासाठी जात आहेत. तेथेही योग्य गाईडलाईनप्रमाणे उपचार व्हावेत म्हणून खासगी डॉक्‍टरांची कार्यशाळा घेत आहोत. जिल्ह्यासाठी तत्काळ फिजिशियनचे पथक मिळावे, अशी मागणी आहे.'' 

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे जिल्ह्यात लक्ष ठेवत असून, आरोग्य सहसंचालक दोन जिल्ह्यांत थांबलेले आहेत. पुणे येथील आरोग्य सहसंचालक डॉ. डिगीकर दोन दिवस जिल्ह्यात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत, असेही श्री. साळे यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी साथ रोग असल्याने फिजिशियनचे पथक दाखल होणार आहे. सध्या शासकीय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची स्पॉट टेस्ट घेतली जात आहे. प्रत्येक पीएससीमध्ये पेनिसीलीनचा पुरवठा करण्यात येत आहे.

जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात रक्तपुरवठ्याची सोयही करण्यात आली आहे. या साथीचा फैलाव होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी कापणी करत असताना काळजी घ्यावी. जेथे भातकापणी सुरू आहे, त्या क्षेत्रात दलदल असल्यास जखम झालेल्या व्यक्तीने गमबूट घालून किंवा हातमोजे घालून काम करावे. उंदीर-घुशी किंवा डुक्कर या प्राण्यांच्या मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसीस होतो. ज्या रुग्णांना ताप येतो, त्याच्या प्लेटलेटस्‌ही कमी होतात. प्लेटलेट रोपणाची तयारी आम्ही केली आहे. खासगी रुग्णालयात उपचार होत असताना ते गाईडलाईनप्रमाणे व्हावेत, याबाबतही काळजी घेतली जात आहे, असेही डॉ. साळे यांनी सांगितले.  

Web Title: Sindhudurg News leptospirosis in 25 villages