पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० लाखांची हानी

नंदकुमार आयरे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून ८९ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ४ व्यक्ती व ७ जनावरांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे उद्‌भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून ८९ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाले आहे. ४ व्यक्ती व ७ जनावरे मृत पावली असल्याची नोंद झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून ८९ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ४ व्यक्ती व ७ जनावरांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कणकवली तालुक्‍यात १६ घरांचे ४ लाख ५ हजार ८०० रुपयांचे, सावंतवाडी तालुक्‍यात ४३ घरांचे २ लाख ७५ हजार ४०० रुपये, कुडाळ ६२ घरांचे १४ लाख २४ हजार ९१५ रुपये, देवगड ५१ घरांचे २२ लाख ३६ हजार ७०० रुपये, दोडामार्ग २२ घरांचे ३ लाख ७ हजार ७९०, वेंगुर्ले २३ घरांचे ८९ हजार ८६० रुपये, मालवण ५६ घरांचे १० लाख ९३ हजार ३०० रुपये, वैभववाडी १३ घरांचे ९२ हजार ०५० रुपयांचे असे मिळून एकूण २८६ घरांचे ५९ लाख २५ हजार ८१५ रुपयांचे नुकसान झाले आहे. 

कणकवली तालुक्‍यात ६ गोठ्यांचे १ लाख ९३ हजार ६०० रुपयांचे, सावंतवाडी ९ गोठ्यांचे ३२ हजार ५०० रुपये, कुडाळ २७ गोठ्यांचे २ लाख ६४ हजार ७८५ रुपये, देवगड ५ गोठ्यांचे ४ लाख ३३ हजार ३०० रुपये, दोडामार्ग ११ गोठ्यांचे २ लाख ३२ हजार ६५० रुपये, वेंगुर्ले ४ गोठ्यांचे १२ हजार ४१५ रुपये, मालवण २४ गोठ्यांचे २ लाख ६४ हजार ७८५ रुपये, वैभववाडी १ गोठ्याचे ३० हजार असे मिळून एकूण ८७ गोठ्याचे १४ लाख ६४ हजार ०३५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

या व्यतिरिक्त वैभववाडी तालुक्‍यातील ३ सार्वजनिक मालमत्तांचे मिळून १३ लाख रुपयांचे नुकसान झाले ाहे. कणकवली तालुक्‍यात १, कुडाळ २ व मालवण तालुक्‍यात ४ जनावरे मृत पावल्याने २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून एकूण ८९ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ९१ घरांसाठी ३ लाख ३४ हजार ७५ रुपयांचे, १८ गोठ्यांसाठी ३५ हजार ६०० रुपयांचे तर मृत झालेल्या १ जनावरासाठी २५००० रुपये, दोन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ८ लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

पावसाची विश्रांती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी ३४०० मिलीमीटर एवढा पाऊस पडला असून गेले चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. भातकापणी हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांकडून भातकापणीला जोर आला आहे.

रस्त्यांचे मोठे नुकसान...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे प्रमाण असल्याने येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वीच मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यातच जुलै-ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने अक्षरशः रस्त्याची दुर्दशा झाली. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील महामार्गासह सर्वच ग्रामीण रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

Web Title: Sindhudurg News loss of Assets due to heavy rains