सावंतवाडी पालिकेला 34 वर्षांचा खर्च देण्याची विज वितरणची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सावंतवाडी - शहरातील वीज खांब दुरूस्तीसाठी लागणारे कर्मचारी हवे असल्यास 34 वर्षांचा दिवे लावणी व डागडुजीचा खर्च द्या, अशी नोटीस वीज वितरण कंपनीकडून येथील पालिकेला बजावली. तब्बल 34 वर्षांनी अशा प्रकारची वसुली करण्याबाबत पत्र मिळाल्याने पालिकेकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सावंतवाडी - शहरातील वीज खांब दुरूस्तीसाठी लागणारे कर्मचारी हवे असल्यास 34 वर्षांचा दिवे लावणी व डागडुजीचा खर्च द्या, अशी नोटीस वीज वितरण कंपनीकडून येथील पालिकेला बजावली. तब्बल 34 वर्षांनी अशा प्रकारची वसुली करण्याबाबत पत्र मिळाल्याने पालिकेकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली असून जाणीवपुर्वक नागरिकांना त्रास देण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. शहरात लावण्यात आलेले दिवे हे पालिकेकडुन लावण्यात आले आहेत. त्यांची देखभाल व दुरूस्तीही पालिकेच्या फंडातून होते. बिलापोटी दरवर्षी 56 लाख रूपये पालिका कंपनीला देते. या बदल्यात कंपनीकडून डागडुजीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. विजेच्या खांबावर चढण्याचा अधिकार वीज कंपनीचे कर्मचारी सोडुन अन्य कोणाला नसल्यामुळे पालिकेला वीज कंपनीची मदत घ्यावी लागते. सद्यस्थिती लक्षात घेता येथील कार्यालयाकडुन पालिकेला वीज कर्मचारी पुरविणे बंद केले आहे. याबाबत पालिकेला कोणतीही आगाऊ सुचना किंवा नोटीस देण्यात आलेली नाही.

परिणामी शहरातील तब्बल 72 हून अधिक ठिकाणच्या पोलवरील दिवे बंदावस्थेत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा भुरट्या चोरांना होत आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाढत्या चोऱ्या तसेच अन्य कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी बंद असलेले दिवे सुरू करण्यासाठी नेहमी प्रमाणे कर्मचारी पुरवावेत, अशी मागणी पालिका प्रशासनाकडुन कंपनीकडे करण्यात आली होती. 

मात्र कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत पालिकेला उत्तर दिले आहे. यात कर्मचारी देणे सोडाच तुमची तब्बल 34 वर्षाची डागडुजी देखभाल दुरूस्तीचे पैसे द्यायचे आहेत. ते पैसे आधी द्या, अशी नोटीसच पालिका प्रशासनाला दिली आहे; मात्र त्या नोटीशीत किती रक्कम आणि कोणत्या वर्षापासुन द्यायची आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती साळगावकर यांनी आज दिली. 

ते म्हणाले, ""वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडुन झालेला प्रकार चुकीचा आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही कंपनीकडुन सेवा घेत आहोत; मात्र आत्ताच ही वसुली करण्यामागे कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हेतू काय ? लोकांना नाहक त्रास देण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडुन हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी. लोकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी आम्ही विज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढू.'' 

आपल्या अधिकारात पत्र... 
पालिकेला देण्यात आलेले बील तत्कालीन वीज मंडळाचे 34 वर्षापुर्वीचे आहे. त्या पत्राला विजवितरण कंपनीचे लेटर हेड वापरून वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक अभियंत्यांनी आपल्या अधिकारात हे पत्र दिले आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत पालिका प्रशासनाच्या वतीने साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

कर्मचारी देण्यात अडचणी... 
याबाबत कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""आमच्याकडुन मागणी प्रमाणे त्यांना दोन कर्मचारी देण्याची कार्यवाही सुरू आहे. सद्यस्थितीत मार्च अखेरची वसूली असल्यामुळे त्यांना कर्मचारी देणे शक्‍य झाले नव्हते. तसे भेट घेवून त्यांना सांगितले. वसुली बाबत त्यांना नोटीस दिली होती; मात्र मागील बाकी बाबत त्यात उल्लेख नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दुसरे पत्र त्यांना देण्यात आले आहे.'' 

Web Title: Sindhudurg News Mahapareshan Notice to Sawantwadi Palika