सिंधुदुर्गात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने बांधणी करणार - शिरीष सावंत

सिंधुदुर्गात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने बांधणी करणार - शिरीष सावंत

कणकवली - सिंधुदुर्गात मनसेची नव्याने बांधणी करणार आहोत. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच संघटनेतील रिक्‍तपदांवर नवीन नियुक्‍त्या केल्या जातील. नाणार रिफायनरीच्या मुद्यांवर मनसे रत्नागिरी-सिंधुदुर्गात आक्रमक भूमिका घेणार आहे. तसेच जनतेच्या प्रश्‍नावर पुढील काळात आंदोलने उभी केली जातील अशी माहिती मनसेचे नेते शिरीष सावंत, नितीन सरदेसाई यांनी 
येथे दिली.

सिंधुदुर्गातील मनसेचा संघटनात्मक आढावा त्यांनी आज घेतला. यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मनसेचे कोकण नेते आणि प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर, मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, ‘‘मनसेची संघटनात्मक बांधणी तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आढावा घेत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील वस्तुस्थितीचा अहवाल अध्यक्ष राज ठाकरे यांना देणार आहोत. त्यानंतर आगमी निवडणुकांबाबत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय श्री. ठाकरे घेतील. परशुराम उपरकर आजारपणामुळे दोन वर्षे राजकारणापासून दूर होते. त्याचा मोठा फटका जिल्ह्यात संघटनेला बसला. मात्र आता ते पुन्हा मनसेच्या सक्रिय झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात मनसेला पुन्हा उभारी मिळणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्‍त्या केल्या जाणार आहेत.’’

‘भाजपमुक्‍त भारत’साठी मनसेचा लढा
आम्ही भाजप विरोधात काम करीत आहोत. तसेच यापुढे देखील भाजपमुक्‍त भारत होण्याच्या उद्देशानेच मनसे संघटना काम करणार आहे. सर्वच आघाड्यांवर केंद्रातील, राज्यातील भाजप सरकार अयशस्वी ठरले आहे. अनेक प्रश्‍न या सरकारनी निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे भाजपच्या उच्चाटनासाठी मनसेचा यापुढील लढा असेल, असे शिरीष सावंत म्हणाले.

नाणारला तीव्र विरोध - सरदेसाई
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर दोन्ही जिल्ह्यातील मनसे संघटना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आक्रमक आंदोलनाची दिशा ठरवतील. मात्र कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प मनसे होऊ देणार नाही. मोदी सरकारच्या उदयानंतर देशातील अनेक पक्षांची वाताहत झाली. मनसेलादेखील मोठा फटका बसला. मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रातून राज ठाकरेंच्या भूमिकेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्याअनुषंगाने मनसे नेते, उपाध्यक्ष, सरचिटणीस आदींचा समावेश असलेली पाच पथक राज्याचा दौरा करीत आहेत. या पथकांकडील अहवाल लवकरच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना देणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com