मालपेवासीयांकडून ‘दारू बाजार’ उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

देवगड - दारूसाठा गावात पोचवणाऱ्याला महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येत दणका दिला. त्या दारू पोचवणाऱ्याला पळता भुई थोडी केली. तालुक्‍यातील मालपे गावठणवाडी येथे हा प्रकार घडला.

देवगड - दारूसाठा गावात पोचवणाऱ्याला महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येत दणका दिला. त्या दारू पोचवणाऱ्याला पळता भुई थोडी केली. तालुक्‍यातील मालपे गावठणवाडी येथे हा प्रकार घडला. याची माहिती विजयदुर्ग पोलिस ठाण्याला देण्यात आल्याने पोलिस तेथे पोचले. सुमारे ३७ हजार किमतीचे १३ दारूचे बॉक्‍स गाडीत सापडल्याची माहिती विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

तालुक्‍यातील मालपे गावठणवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी वितरित होत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. गावातील दारू विक्रीमुळे आधीच त्रस्त असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी दारू वितरित करण्याऱ्याला रोखले. स्थानिक दारू विक्री करणाऱ्या एका दांपत्याला ही दारू विक्रीसाठी वितरित करण्यात येणार होती; मात्र अचानक स्थानिकांनी त्याला विरोध केल्यामुळे वाहन चालकाने तेथून पळ काढला.

दरम्यानच्या काळात कोणा अज्ञाताने दारू वाहतूक करणाऱ्या संबंधित वाहनाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. दारू वाहतूक होत असल्याची आणि स्थानिकांनी त्याला रोखल्याची माहिती नंतर विजयदुर्ग पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मोठा जमाव जमला होता. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. यावेळी पोलिसांकडे स्थानिकांकडून आपल्या तीव्र भावना व्यक्‍त करण्यात आल्या. पोलिसांच्या तपासणीत दारू वाहतूक करणाऱ्या गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्‍स भरलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सुमारे ६० हजार रुपये किमतीचे वाहन आणि ३७ हजार रुपये किमतीची सुमारे १३ बॉक्‍स दारू असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. याबाबत मालपे गावठणवाडी येथील दारू विक्री करणारे संबंधित संशयित दांपत्य तसेच दारू वितरित करणारा कणकवली येथील संशयित विलास हुन्नरे अशा तिघांवर गुन्हा नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी एक संशयित महिला तसेच संशयित हुन्नरे अशा दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.

दारू येतेच कशी ?
पोलिस अधीक्षकांच्या अवैध दारू विरोधी मोहिमेनंतरही अवैधरित्या चोरटी दारू वितरित होत असल्याचे या घटनेमुळे समोर येत आहे. एकीकडे दारू वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारे दारू वितरित होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांची तपासणी नाकी चुकवून दारू वाहतूक करतातच कसे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: sindhudurg news malpe villagers destroyed liquor market