मालवणी कलाकारांनी बनवला १७ दिवसांत ‘रॉबिनहुड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कणकवली -  कोकणचे सौंदर्य आणि मालवणी भाषेची गोडी रसिकांसमोर सादर करीत बॉलिवूडचा छंद असलेल्या आणि हिरो बनण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांची व्यथा मांडणारा अस्सल ‘मालवणी रॉबिनहुड’ हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

कणकवली -  कोकणचे सौंदर्य आणि मालवणी भाषेची गोडी रसिकांसमोर सादर करीत बॉलिवूडचा छंद असलेल्या आणि हिरो बनण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांची व्यथा मांडणारा अस्सल ‘मालवणी रॉबिनहुड’ हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

स्थानिक कलाकारांनी अवघ्या १७ दिवसांत साकारलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण कणकवलीच्याच परिसरात झाले आहे. स्थानिक कलाकारांना पाठबळ देण्यासाठी रसिकांनी हा चित्रपट जरूर पाहावा, असे आवाहन ज्येष्ठ कलाकार दीपक परब, अभय खडपकर यांच्यासह परमहंस प्रॉडक्‍शनच्या कलाकारांनी केले आहे. 

मालवण बोली भाषेतील पहिला भिकू हा चित्रपट डिसेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर रॉबिनहुड हा सव्वा तासाचा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. कोकणचे सौंदर्य आता सातासमुद्रा पलीकडे पोहोचले आहे. मालवणी भाषेला मच्छिंद्र कांबळी यांनी दर्यापार नेले. अनेक मालवणी मालिका दुरचित्रवाणीवर आज गाजत आहेत. भिकू चित्रपटातील काही अनुभवी आणि कणकवली परिसरातील उदयोन्मुख कलाकारांनी ‘रॉबीनहुड’ हा चित्रपट बनविला आहे. याचे दिग्‌दर्शन नितीन चंद्रकांत कांबळी, संकलन रवीकिरण शिरवलकर तर निर्माता म्हणून अमित ठाकूर यांचे सहकार्य लाभले आहे.

चित्रपटात प्रथमच प्रशांत ठाकूर, नितेश बुचडे, अक्षय जाधव, अनंत ढवण, नितीन कांबळी यांनी भूमिका बजावल्या असून विशेष म्हणजे निकीता वळंजू हिचे दमदार पदार्पण चित्रपटात होत आहे. मराठी चित्रपटातील अभिनेता म्हणून अनेक पुरस्कार पटकावलेले अभय खडपकर, दिपक परब यांच्यासह विवेक वाळके, अक्षता कांबळी, अरूण कोरगांवकर, विलास खानोलकर, उमेश वाळके, अमित ठाकूर, शैलेश सावंत आणि बालकलाकार यश म्हसकर यांच्या भूमिका आहेत.

रॉबिनहुडचे संपूर्ण चित्रीकरण हे पाच दिवसाचे असून १७ दिवसात पूर्ण झालेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण कणकवली जवळच्या आशिये गावातील गांगोभैरी, दत्त मंदिर, वरवडे संगम, तरंदळे धरण, पालखेश्‍वर देवस्थान, कळसुलीतील मधुकर हॉटेल आणि वाळकेश्‍वर मंगल कार्यालय तसेच करंजे येथील पालखेश्‍वर मंदिरातही झाले आहे.

या कलाकारांना प्रोत्साहन म्हणून राकेश काणेकर, संतोष काकडे, शाम सामंत, कौस्तुभ राणे आणि अजित आजगांवकर यांचे सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता कणकवलीतील मराठा नाट्यगृहात प्रथमच प्रदर्शित होणार आहे. रसिकांना अल्पदराच्या तिकीटमध्ये तो पाहता येणार आहे. त्या चित्रपटातील एक गाणे नव्या पिढीला आकर्षित करणार आहे, असा विश्‍वास या चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Sindhudurg News Malvan artists make 'Robinhood' in 17 days