अवैध धंद्यांना आमदार नाईकांचे पाठबळ - केणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मालवण - तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आमदार वैभव नाईक यांचाच पाठिंबा आहे. सुकळवाड येथील मुसळे कुटुंबीयांचीही दादागिरी त्यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे. संपूर्ण तालुक्‍यात गोवा बनावटीची दारू उपलब्ध होण्याचे कुळ आणि मूळ सुकळवाडमध्येच आहे. मुसळे कुटुंबीयांच्या घरी नेहमीच आमदारांची उठबस असते. यामुळे प्रशासनाकडून मुसळे कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

तालुका स्वाभिमानच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर आदी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, ""सुकळवाड तसेच तालुक्‍यात बेकायदेशीर धंद्यांना सध्या ऊत आलेला आहे. पोलिस यंत्रणेकडून यावर कारवाई होताना दिसत नाही. पोईप करमाळेवाडी येथील पुलाचे बांधकाम झालेले नसतानाही त्याचे बिल अधिकाऱ्यांनी संगनमताने खर्ची घातले आहे. गेल्या तीन वर्षात तालुक्‍यात विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक सरपंच यांनी कामे रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. सरपंच नीलेश खोत आणि गोळवण उपसरपंच संजय पाताडे यांना ठेकेदाराने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. आमदार नाईक यांनीच पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना अधिकारी आणि ठेकेदार यांना केली आहे. निकृष्ट कामांना आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तक्रार होत असलेल्या एकाही कामाची तपासणी करण्याचे धाडस आमदारांनी दाखविलेले नाही. अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तालुक्‍यातील जनतेला त्रासदायक ठरणारे रस्ते निर्माण केले जात आहेत.''

काळसे- धामापूर, पोईप अंतर्गत रस्ते, गोळवण कुमामे रस्ता याठिकाणी निकृष्ट कामे सुरू आहेत. याठिकाणची सर्व कामे आमदारांच्या संबंधित पक्षाच्या ठेकेदारांकडून केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वीज समस्यांवर आज घेराओ
वीज समस्यांचा पाढा वाचण्यासाठी उद्या (ता. 9) येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात येणार असल्याचेही श्री. केणी यांनी सांगितले.
 
Web Title: Sindhudurg News Mandar Keni Press