रस्ता कामाचे चार दिवस उजाडलेच नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

दोडामार्ग - मांगेली फणसवाडी रस्त्यासाठी फणसवाडी येथील ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसात काम करण्याचे लेखी पत्र गतवर्षी 8 जानेवारीला देऊनही अद्याप काहीच न केल्याने फणसवाडी ग्रामस्थ पुन्हा उपोषणास बसले आहेत. प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. 

दोडामार्ग - मांगेली फणसवाडी रस्त्यासाठी फणसवाडी येथील ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसात काम करण्याचे लेखी पत्र गतवर्षी 8 जानेवारीला देऊनही अद्याप काहीच न केल्याने फणसवाडी ग्रामस्थ पुन्हा उपोषणास बसले आहेत. प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. 

मांगेली तळेवाडी ते फणसवाडी हा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता. या रस्त्यावरच देशी विदेशी पर्यटकांचे वर्षा पर्यटनातील आकर्षण असणारा मांगेलीचा धबधबा मिळतो. साहजिकच या रस्त्यावरुन अव्याहतपणे वाहनांची वर्दळ सुरुच असते. जानेवारी 2017 आधीपासून या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यात भलेमोठे खड्डे पडले आहेत.

डांबरीकरण उखडून गेले आहे. त्यामुळे 7 जानेवारी 2017 पासून रस्त्यासाठी फणसवाडीवासियांनी तळेवाडी येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. ते 8 जानेवारीपर्यंत सुरु होते. "बांधकाम'च्या उपविभागीय अभियंत्यांनी 8 जानेवारीला उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले आणि उठवले होते. त्यात त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा झाल्यानुसार रस्त्यातील खड्डे बीबीएम आणि कार्पेटने भरुन घेतले जातील.

पर्यटन विकास आराखड्यातून रस्त्याचे काम करण्यात येईल, त्याची कार्यवाही चार दिवसात करु असे म्हटले होते; पण प्रत्यक्षात सव्वा वर्ष उलटले तरीही काहीच कार्यवाही झालेली नाही. उलट मध्ये पावसाळा गेला. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था आणखी झाली. त्यामुळे फणसवाडीवासियांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे. 

ग्रामपंचायत सदस्य एकनाथ गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु आहे. उपोषणात शिवाजी वर्णेकर, गुणाजी सुखदेव गवस, विठ्ठल गवस, रामदास गवस, प्रतिमा गवस, लक्ष्मी चोर्लेकर, भागिरथी गवस, द्रौपदी बांदेकर, रुक्‍मिणी शेटकर, लक्ष्मी गवस, सुप्रिया गवस, शरद गवस, मिनाक्षी गवस, प्रतिक्षा सडेकर, शिवानंद शेटकर, चंद्रावती गवस, सीता गवस, वासंती गवस, शीतल गवस, नमिता गवस, सुभद्रा गवस, पार्वती गवस, समिक्षा गवस, रुपावती गवस आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. फणसवाडीतील सुमारे शंभर स्त्री-पुरुषांनी त्यांना पहिल्या दिवशी पाठिंबा दिला आहे. 

उपोषणकर्ते "बेदखल' 
तहसीलसमोर सुरु असलेल्या उपोषणाची बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, तहसीलदार यांनी दखल घ्यायला हवी होती; पण दुपारी अडीच वाजेपर्यंत कुणीही उपोषणस्थळाकडे फिरकले नव्हते. त्यामुळे सर्वांनीच उपोषणकर्त्यांना "बेदखल' केल्याची भावना उपोषणकर्त्यांमध्ये होती. 

Web Title: Sindhudurg News Mangeli - Phanaswadi Road Issue