सिंधुदुर्गातील आरोग्य प्रश्नावर आंदोलनाचा इशारा

अमोल टेंबकर
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्यास पालकमंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी जिल्ह्यासाठी सुसज्ज हॉस्पीटल आणण्यासाठी प्रयत्न करावेत, - मंगेश तळवणेकर 

सावंतवाडी - जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी आता ठोस उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यावासीयांच्यावतीने आता एल्गार पुकारण्यात येणार आहे, याची सुरूवात उद्या (ता. 7) महामेळाव्यापासुन होणार आहे. यात आंदोलन, उपोषण आणि आत्मदहनाचा मार्ग स्विकारण्याची आमची तयारी आहे, असा इशारा जिल्हा परिषदचे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्यास पालकमंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी जिल्ह्यासाठी सुसज्ज हॉस्पीटल आणण्यासाठी प्रयत्न करावेत, - मंगेश तळवणेकर 

गोवा बांबूळी येथील ‘गोमेकॉ’मध्ये दाखल होणार्‍या रुग्णांना शुल्क आकारण्यात येत आहे. या विरोधात श्री. तळवणेकर यांनी उद्या (ता.7) येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. यावेळी जिल्ह्यातून दहा हजारहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा दावा श्री. तळवणेकर यांनी केला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी त्यांनी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी तुषार वेंगुर्लेकर उपस्थित होते.

श्री. तळवणेकर म्हणाले, “गोवा बांबूळी रुग्णालयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टीने हा निर्णय वेदनादायी आहे. सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राकडुन गोव्याला विज आणि पाणी या दोन गोष्टी पुरविण्यात येत आहेत. दिवसाकाठी शेकडो बस सिंधुदुर्गातून मुंबईच्या दिशेने जात आहे. आपण अनेक गोष्टीत गोव्याला सहकार्य करीत आहे; मात्र गोव्याची आमच्याबाबतची भूमिका आडमुठेपणाची आहे. त्यामुळे आता आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. ज्या गोव्याने कारवार आणि तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याच्या जोरावर मेडीकल कॉलेजची परवानगी मिळविली. त्याच गोव्याला आता आमच्या जिल्ह्यातील रुग्णांचा विसर पडला आहे. ही खेदाची बाब आहे.”

श्री. तळवणेकर पुढे म्हणाले, “याठिकाणी जिल्ह्यातील नेते सुध्दा उदासिन आहेत. त्यांच्याकडुन भविष्यात योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालये आहेत. त्याठिकाणी प्रत्येक अत्याधुनिक सेवा देणारे युनिट चालू केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा रुग्णांना होणार आहे. एखादे मोठे शासकीय रुग्णालय उभे केल्यास त्यासाठी लोक पुढाकार घेवून जमीन घेवून देतील यात काही शंका नाही; मात्र त्यांच्याकडुन अशा प्रकारे सकारात्मक प्रयत्न होत नाही, हे आमचे दुदैव आहे. उद्या होणार्‍या महामेळाव्यात या सर्व प्रश्‍नांवर उहापोह होणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका ठरविली जाणार आहे.”

सिटिस्कॅनचे आश्‍वासन केसरकरांनी पुर्ण करावे
लोकांच्या आणि रुग्णांच्या मागण्या घेवून आम्ही तापाच्या साथीच्या काळात उपोषण केले होते; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमच्याशी चर्चा न करता जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक घेण्यात धन्यता मानली हा प्रकार चुकीचा आणि मनाला वेदना देणारा आहे. आमच्या मागण्या त्यांनी ऐकुन घेणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. ही आमची खंत आहे, असे श्री. तळवणेकर यांनी सांगुन दोन महिन्यात सिटिस्कॅन देण्याचे आश्‍वासन श्री. केसरकर यांनी पुर्ण करावे, त्यातील एक महिना पुर्ण झाला आहे, असा टोला श्री. तळवणेकर यांनी लगावला.

Web Title: Sindhudurg News Mangesh Talavnekar Press