‘सहकारातून समृद्धी’कडे वाटचाल करा - आंबा व्यावसायिक संघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मालवण -  सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघातर्फे झालेल्या मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील धुरिवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण-जोशी संकुल येथे झालेल्या या शिबिरात अनेक मार्गदर्शकांनी आंबा पीक कर्ज, अर्थसाहाय, पीक विमा, योजना, पीक संरक्षण आदी विविध विषयांबाबत सखोल मार्गदर्शन केले. आंबा उत्पादक व व्यावसायिक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सभासद होऊन व्यवसाय वृद्धीसाठी संघटित होणे ही भविष्यातील गरज असल्याने ‘सहकारातून समृद्धी’ या संघाच्या ब्रीदवाक्‍याप्रमाणे वाटचाल करावी असे आवाहन 
या वेळी केले.

कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे बाळकृष्ण गावडे यांनी पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. कृषी केंद्रामाफत संघाच्या सहकार्याने तज्ज्ञ मार्गदर्शकांचे कायम मार्गदर्शन देण्यात येईल, याचा फायदा आंबा उत्पादक शेतकरी निश्‍चित घेतील असा विश्वास यावेळी गावडे यांनी व्यक्त केला. जय ओम कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे रमाकांत सातार्डेकर यांनी व्यक्तिगत स्तरावर व सहकारी तत्त्वावर संघाच्या माध्यमातून लाभ घेता येईल अशा राज्य व केंद्र शासकीय स्तरावरील योजनांची माहिती दिली.

श्री भावई शेतकरी मंडळ, झाराप कुडाळचे संजय सामंत यांनी पीक कर्ज व पीक विमा यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी संस्थेचे माजी संचालक विलास हरमलकर यांनी प्रातिनिधिक प्रश्न विचारून सहकार्य केले. संजय सामंत यांची संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून नेमणूक व्हावी, असा ठराव घेण्यात यावा अशी सूचना संस्थेचे संचालक आप्पा चव्हाण यांनी केली. संघाचे अध्यक्ष संजय नरे यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. संजय सामंत यांनीही मार्गदर्शक सल्लागार होण्यास सहमती दिली.

या वेळी युनियन बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक संदीप घुले यांनी बॅंकेकडून मिळणाऱ्या कृषी संदर्भातील अर्थसाह्याची माहिती देऊन याबाबत योग्य प्रस्तावासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. सर्व सभासदांचा एक व्हाट्‌स अॅप ग्रुप बनवून आंबा उत्पादकांनी आपले अनुभव व समस्या ग्रुपवर मांडून निराकरण करण्याचे ठरविण्यात आले.  शिबिरात ५१ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी संस्थेचे उत्स्फूर्तपणे सभासदत्व स्वीकारले. दीडशेहून अधिक सदस्य नोंदणी अर्जांचे वितरण करण्यात आले.

शिबिराचे प्रायोजकत्व निर्मल सीड्‌स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव यांनी स्वीकारले. या शिबिरासाठी संघाचे अध्यक्ष संजय नरे, अंतोन मेंडीस, संचालक आप्पा चव्हाण, विजय फाटक, जयवंत लुडबे, जगदीश गावकर, रत्नाकर कोळंबकर आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन रत्नाकर कोळंबकर यांनी केले.

Web Title: sindhudurg news Mango Business Association