सागरी आक्रमणाने सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी होतेय खिळखिळी

सागरी आक्रमणाने सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी होतेय खिळखिळी

मालवण -  सागरी लाटांशी झुंज देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणच्या तटबंदीचे दगड ढासळू लागल्याने मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी किल्ल्यात घुसू लागले आहे. काही ठिकाणच्या तटबंदीची दुरुस्ती पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आली आहे; मात्र तटबंदीची जी कामे प्राधान्याने घेणे आवश्‍यक होते, त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने तटबंदीची स्थैर्यता दिवसेंदिवस धोक्‍यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत कुरटे बेटावर उभा असलेला किल्ला गेली अनेक वर्षे सागरी लाटांशी झुंज देत आहे. समुद्राच्या अजस्र लाटांच्या माऱ्यामुळे सुमारे २० वर्षांपूर्वी तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली. पश्‍चिमेकडील तटबंदीस याचा मोठा फटका बसला. तटबंदी ढासळून भगदाड पडल्याने समुद्राचे पाणी किल्ल्यात घुसू लागले. परिणामी तटबंदीच्या अन्य भागासही मोठा धोका निर्माण झाला. त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी किल्ल्यातील  रहिवासी, शिवप्रेमींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला; मात्र हा किल्ला केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने या विभागाकडे जो पाठपुरावा करणे आवश्‍यक होते तो झाला नाही.

त्यामुळे पुरातत्त्व विभागाचे याप्रश्‍नी किल्ला रहिवासी तसेच शिवप्रेमींनी लक्ष वेधले. सातत्याने पाठपुरावाही केला; मात्र सुरवातीच्या काळात पुरातत्त्व विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरविले नाही. त्यामुळे किल्ल्याचे भवितव्य अंधकारमय बनले. किल्ल्याची तटबंदी सातत्याने ढासळत असल्याने तसेच पुरातत्त्व विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने शिवप्रेमी संतप्त बनले. मधल्या काळात विविध राजकीय पक्षांनी शिवप्रेमी तसेच किल्ला रहिवाशांसोबत तीव्र आंदोलन छेडत आवाज उठविला. अखेर शिवप्रेमींच्या आंदोलनाची दखल घेत २००३ पासून पुरातत्त्व विभागाच्यावतीने ढासळणाऱ्या तटबंदीच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात करण्यात आली.

गेली काही वर्षे पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पश्‍चिम तटाकडील ज्या भागात भगदाडे पडली होती ती बुजविण्याची कार्यवाही पहिल्या टप्प्यात करण्यात आली. किल्ल्याची उभारणी करताना तटबंदीसाठी वापरण्यात आलेले दगड विशिष्ट प्रकारच्या मिश्रणात बसविण्यात आले होते. त्यामुळे ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती करताना जुन्याच पद्धतीचा वापर करण्याचा आग्रह शिवप्रेमींनी धरला. कारण सिमेंट किंवा अन्य साहित्याचा वापर करून तटबंदीची दुरुस्ती केली गेल्यास लाटांच्या माऱ्यात ती व्यवस्थित राहील का? असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

या सर्व बाबींचा विचार करत पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात आली. गेल्या आठ दहा वर्षात तटबंदी दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ज्या ठिकाणी भगदाडे पडली ती बुजविण्याची कार्यवाहीही करण्यात आली; मात्र अद्यापही किल्ल्यातील अन्य भागातील तटबंदीच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. तटबंदीच्या पायालगतच्या भागातून अद्यापही समुद्राचे पाणी किल्ल्यात घुसत आहे. परिणामी याठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन वाढल्याने जमिनीही खारट बनल्या आहेत. 

संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीत चहूबाजूने झाडे वाढली आहेत. या झाडांची मुळे तटबंदीत खोलवर गेल्याने तटबंदीचे दगड दुभंगू लागले आहेत. त्यामुळे तटबंदीत वाढणारी झाडे हा चितेंचा विषय बनला आहे. सहा सात वर्षापूर्वी किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर समितीच्यावतीने तटबंदीतील झाडांची मुळे काढून टाकण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात काही प्रमाणात यश मिळाले. मात्र सद्यःस्थितीत किल्ल्याच्या तटबंदीत पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडे वाढू लागल्याने तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. विविध पक्ष्यांचे वस्तीस्थान किल्ल्यावर असते. या पक्षांच्या विष्टेतून पडणाऱ्या बियांमुळेच तटबंदीत झाडे उगवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तटबंदीला पोचणारा धोका लक्षात घेता यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे.

शिवप्रेमींनी शासनाचे लक्ष वेधले...
किल्ल्यात शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव असे शिवराजेश्‍वर मंदिर आहे. या मंदिराचीही गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे. मंदिरातील सभामंडप तसेच अन्य भागाची दुरवस्था झाल्याने किल्ला रहिवासी, प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमींनी याप्रश्‍नी शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार मंदिराच्या दुरुस्तीसाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हे काम सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार होते. मात्र मंदिराच्या मूळ ढाच्यात कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट करत पुरातत्त्व विभागाने या कामाला आक्षेप घेतल्याने मंदिराच्या दुरुस्तीचे काम रखडले. त्यानंतर आता पुन्हा या मंदिराच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र पुरातत्त्व विभागाकडून अद्याप याबाबतची कार्यवाही न झाल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com