पराभव भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा

प्रभाकर धुरी
शनिवार, 16 डिसेंबर 2017

दोडामार्ग - माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांचा विजय शिवसेनेच्या संघटनात्मक एकजुटीचा आहे, तसाच तो त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या आशा अपेक्षांचा आहे.

दोडामार्ग - माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांचा विजय शिवसेनेच्या संघटनात्मक एकजुटीचा आहे, तसाच तो त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या आशा अपेक्षांचा आहे.

निकालामुळे भाजपचा तालुक्‍यातील एकमेव मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला आहे. निवडणुकीदरम्यान भाजपची संघटनात्मक एकी प्रचारात दिसली नाही, ती दिसली तर कदाचित निकाल वेगळा आलाही असता. 

तालुक्‍याचा राजकीय इतिहास पाहता माटणे मतदारसंघ कायमच भाजपकडे राहिला आहे. अर्थात तालुक्‍यात शिवसेना पहिल्यापासून वरच्या स्थानावर होती आणि आहे. पंचायत समिती पहिल्यांचा अस्तित्वात आली तेव्हा शिवसेना भाजपची युती होती. शिवसेनेने माटणेची जागा भाजपला सोडली आणि ती जागा जिंकण्यासाठी मदतही केली. तेव्हापासून तीच जागा भाजपकडेच असायची. शिवसेनेसोबत वाढलेल्या भाजपने विजयानंतर तेथे हातपाय पसरले.

भरत जाधव यांच्या रुपाने भाजपला चांगला कार्यकर्ता मिळाला आणि भाजपचे तिथले स्थान पक्के झाले. युती तुटली, दोघांनी स्वतंत्र ताकद आजमावली. त्यात फेब्रुवारीमध्ये पुन्हा भाजपचीच सरशी झाली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या भरत जाधव यांना लोकांनी निवडून दिले. त्यात भाजपच्या प्रभावापेक्षा त्यांचा प्रभाव अधिक होता हे विसरुन चालणार नाही. दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा शिवसेना-भाजप पोटनिवडणुकीत आमने-सामने आली.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी महाराष्ट्र स्वाभिमानने भाजपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यापुढे शिवसेनेशी युतीच करणार नसल्याचे जाहीर केले. अर्थात विधानसभा, जिल्हा परिषद- पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही भाजप शिवसेनेने स्वबळावरच लढवल्या होत्या आणि शिवसेनेने आपला नंबर वन कायम ठेवला होता. स्वाभिमानला सोबत घेऊन भाजपने शिवसेनेविरुद्ध लढाईचे रणशिंग फुंकले खरे; पण संघटनात्मक शक्तीचा अभाव या निवडणुकीत जाणवला.

निवडणुकीआधी शिवसेनेचे पूर्वीचे उमेदवार अंकुश गवस यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ गवस आणि गावकऱ्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपात प्रवेश दिला, त्यामुळे विर्डी गाव पूर्णपणे भाजपच्या पाठीशी राहील असे चित्र होते; पण तसे झाले नाही. श्री. गवस यांना त्यावेळी (शिवसेनेत असतांना) २९४ मते पडली होती तर यावेळेला ते भाजपमध्ये जाऊनही भाजपचे उमेदवार रुपेश गवस यांना विर्डीत फक्त १६५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवाराला १८९ मते मिळाली. याचा अर्थ विर्डी गाव भाजपमय होऊनही तेथे शिवसेनेचाच प्रभाव राहिला असेच म्हणावे लागेल.

भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस आणि अन्य पदाधिकारी प्रचारात दिसले नाहीत. याऊलट शिवसेनेतील गट तट, कुरबुरी विसरुन सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. साहजिकच दोन्ही राजकीय पक्षांच्या संघटनात्मक शक्तीचा तुलनात्मक प्रभाव प्रचारात आणि विजयात दिसला.

माटणेतील निवडणुकीचा विजय पराजय संघटनात्मक शक्तीच्या पातळीवर जसा पाहायला हवा तसाच तो सर्वसामान्य मतदारांच्या आशा अपेक्षांच्या फलश्रुतीवरही पाहायला हवा. या मतदारसंघातील लोक अनेक बाबतीत वंचित आणि उपेक्षित आहेत. अलिकडे युवा पिढी सुशिक्षित होत आहे. जुन्या जाणत्यांना काय हवे, काय मिळाले आणि काय मिळणे आवश्‍यक आहे यातला फरक कळू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या आशा अपेक्षांचा सन्मान आणि पूर्ती करणारा त्यांच्यासाठी नेता आहे. धुरी सभागृहात जावे असे त्यांना म्हणूनच वाटते असावे.

जिल्हा परिषद निवडणुकीत माटणे पंचायत समिती मतदारसंघाने त्यांना भरभरुन मते दिली; पण उसप आणि पिकुळेत ते मागे पडले आणि शंभर मतांनी पराभूत झाले. तरीही त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठीची कामे करणे थांबवले नाही. त्यामुळेच ते मतदारांच्या विश्‍वासास पात्र ठरले आणि मागच्या वेळेपेक्षा अधिक मते देऊन त्यांनी धुरी यांना पंचायत समिती सभागृहात पाठविले. यापुढेही आपल्या विकासासाठी धुरी प्रयत्न करतील असा विश्‍वास त्यांना वाटत असावा म्हणूनच हा विजय सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षांचा विजय आहे असेच म्हणावे लागेल.

यावेळेस मोठे मताधिक्‍य...
फेब्रुवारीमधील निवडणुकीत भाजपचे उमेदवार भरत जाधव केवळ चार मतांनी विजयी झाले होते, तर यावेळेला शिवसेनेचे उमेदवार तब्बल ६८५ एवढ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाले आहेत. चार आणि सहाशे पंच्याऐंशीमधील फरक शिवसेनेचे माटणेत अस्तित्वच कुठे, शिवसेना आमच्यामुळे आहे, असे म्हणणाऱ्या भाजपसाठी नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

Web Title: Sindhudurg News Matane Election special