जातपडताळणीसारखी दुसरी भ्रष्ट यंत्रणा नाही - महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

कणकवली - संपूर्ण देशात जात पडताळणी सारखी दुसरी भ्रष्ट यंत्रणा नाही. माझ्यासह अनेक नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना जात पडताळणीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बाद केले, अशी खंत मुंबई महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी येथे व्यक्‍त केली. 

कणकवली - संपूर्ण देशात जात पडताळणी सारखी दुसरी भ्रष्ट यंत्रणा नाही. माझ्यासह अनेक नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना जात पडताळणीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बाद केले, अशी खंत मुंबई महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी येथे व्यक्‍त केली. 

येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात वैश्‍य बांधवांचा मेळावा झाला. यात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना सिंधुदुर्ग वैश्‍यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

श्री. महाडेश्‍वर म्हणाले, ""जात पडताळणी यंत्रणेने निपक्षःपातीपणे काम होत नसल्याने अनेकांना कटू प्रसंगांना सामोरे जावे लागते. आमदारकी, खासदारकी जाण्याचा धोका असतो. मुंबई महापालिकेत वैश्‍यवाणी प्रवर्गातून मी निवडून आलो; पण जात पडताळणीमध्ये अपात्र ठरलो. त्यानंतर शांत न बसता संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. वैश्‍यवाणी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होण्यासाठी महाराष्ट्रात लढा उभा केला. सद्यस्थितीत वैश्‍यवाणी, वाणी, कुलवंत वाणी आदींचा समावेश ओबीसीमध्ये झालाय. फक्त वैश्‍य असा दाखल्यावर उल्लेख असलेले बांधव ओबीसीत समावेशापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यासाठीही आपला अविरत लढा सुरू आहे.'' 

संदेश पारकर यांनी सर्वांनी संघटीत होऊन समाजाचा विकास घडवूया, असे आवाहन केले. राजन तेली यांनी गावागावातील मंडळे एकत्र आणून त्यांचे प्रश्‍न जाणून घेऊया आणि सोडविण्यासाठीची कार्यपद्धती ठरवूया, असे आवाहन केले. 

वैश्‍य समाजबांधवांच्या रक्‍तामध्ये उद्योजक आहे. आपल्या भागातील अशा सर्वच उद्योजकांनी एकत्र यायला हवे. आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण करायला हवी. मुंबई महापालिकेच्या मार्केट इमारतींमध्ये कोकणातील बचतगटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था करण्यासाठी मुंबई महापौरांनी पुढाकार घ्यायला हवा.

-  प्रमोद जठार

नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, ""नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सर्व समाजाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या घरी येऊन सत्कार केला. पण वैश्‍य समाजाचा एकही पदाधिकारी फिरकला नाही किंवा अभिनंदनाचा फोन देखील केला नाही. फक्त पावती फाडायची असली की वैश्‍यवाणी समाजाचे पुढारी आपल्याकडे येतात.'' 

वैश्‍य समाजात दुही माजविण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला. तसेच 75 टक्‍के ओबीसी समाजावर उर्वरीत 25 टक्‍के समाजाचा दबाव आहे. हा दबाव झुगारून द्यायला हवा.

- सुनील भोगटे, वैश्‍य समाज जिल्हाध्यक्ष

या कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर, शंकर पार्सेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, संदेश पारकर, प्रमोद जठार, बाळा भिसे, राजन तेली, अन्नपूर्णा कोरगावकर, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, मानसी मुंज, सुनील कोरगावकर, दादा कुडतरकर. ऍड.दीपक अंधारी, संजय पडते, विजयानंद पेडणेकर, उमेश वाळके, नितीन तायशेटे आदींचा सत्कार करण्यात आला. 

ओबीसींच्या सवलती बंद करण्याचा घाट 
वैश्‍यसमाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांनी, केंद्र व राज्य शासन ओबीसींच्या सवलती टप्पाटप्प्याने बंद करण्याचा घाट घालत असल्याची टीका केली. पूर्वी विदेशातील शिक्षणासाठी 100 टक्‍के सवलत होती ती आता 25 टक्‍क्‍यावर आणली आहे. याखेरीज ओबीसींना पदोन्नती न देण्यासाठीही धोरणं आखली जात आहेत. त्यामुळे सर्वच ओबीसी बांधवांनी आपल्या हक्‍कासाठी जागरूक रहावे असे आवाहन त्यांनी केले. 

Web Title: Sindhudurg News Mayour Vishwanath Mahadeshwar comment