माकडे मारण्याचा प्रस्ताव लाल फितीत...

अमोल टेंबकर
शुक्रवार, 4 मे 2018

सावंतवाडी - दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या माकडताप तापसरीच्या पार्श्‍वभूमीवर या परिसरात फिरणारे माकड मारण्यास परवानगी द्यावी, हा सावंतवाडी वनविभागाचा प्रस्ताव नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या ‘लाल फितीत’ अडकला आहे; दुसरीकडे माकडतापाचा फैलाव सुरूच आहे.

सावंतवाडी - दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या माकडताप तापसरीच्या पार्श्‍वभूमीवर या परिसरात फिरणारे माकड मारण्यास परवानगी द्यावी, हा सावंतवाडी वनविभागाचा प्रस्ताव नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या ‘लाल फितीत’ अडकला आहे; दुसरीकडे माकडतापाचा फैलाव सुरूच आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्‍यात गेली तीन वर्षे माकडतापाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यात आतापर्यंत तब्बल २३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. तापसरीवर नियंत्रणासाठी वन आणि आरोग्य विभागाने प्रयत्नांचे पराकाष्टा करूनही फारसा फरक पडलेला नाही. हा आजार प्रामुख्याने माकडांपासून फैलावतो. केएफडी पॉझिटीव्ह माकडाचे रक्त शोषलेली गोचिड माणसाला चावल्यास याची लागण होते. यावर नियंत्रणासाठी माकडांना मारण्याची अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडुन तसेच मृत व अत्यवस्थ झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडुन करण्यात येत होती.

तसा प्रस्ताव येथील वनविभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र याला तब्बल दीड वर्षाचा कालखंड लोटला तरी तरी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही.

सद्यस्थितीत काजू, आंबा बागायतीचा हंगाम असल्यामुळे दोन्ही तालुक्‍यातील लोक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. याबाबत धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

फैलाव कसा होतो?
केएफडी पॉझिटिव्ह माकड व पिसवा यांचा एकमेकांशी संबंध येतो. अशा केएफडी पॉझिटिव्ह गोचीड किंवा पिसवा माणसाला चावल्या, केएफडी पॉझिटिव्ह रक्ताचा माणसाच्या रक्ताशी संबंध आला की माणूस केएफडी पॉझिटिव्ह होतो. सिंधुदुर्गात गेल्या वर्षी केर या गावात माकडतापाचा पहिला रुग्ण आढळला. गेल्या वर्षी या तापाने सात जणांचा मृत्यू झाला. यंदा पुन्हा या तापाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

काय आहे माकडताप?
माकडताप हे ‘केएफडी’ आजाराचे स्थानिक अथवा प्रचलित नाव. १९५७ मध्ये कर्नाटकमधील शिमोगाजवळच्या जंगलात माकडांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत होता. शिवाय तापाने आजारी पडण्याचे, रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे त्यावर संशोधन करण्यात आले, तेव्हा माकडांच्या अंगावर गोचीड व पिसवा आढळल्या. त्यांच्या रक्तात नवे विषाणूही आढळले. शिमोगाजवळच्या क्‍यासनूर जंगलात तो विषाणू व आजार आढळल्याने त्या आजाराचे क्‍यासनूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच ‘केएफडी’ असे नाव ठेवण्यात आले. 

माणसं मेली तरी चालतील, माकडे जगली पाहिजेत, अशी भूमिका वनविभागाची आहे की काय? रुग्ण दगावल्यानंतर त्याच्या मागे कुटुंबाची होणारी परवड आम्ही पाहिली आहे. शासनाकडून देण्यात येणारी मदत तुटपुंजी आहे. यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
- मंदार कल्याणकर, 

सरपंच, बांदा

माकड जैवविविधतेला पोषक घटक आहे. माणसाच्या फायद्याचे आहे; मात्र त्यांच्यामुळे माणसाचा जीव जात असेल तर त्याबाबत योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे. वाढत्या मृत्यूची संख्या लक्षात घेता तूर्तास तरी माकड थेट मारल्याशिवाय पर्याय नाही. याबाबत योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे.
- सुभाष पुराणिक, 

सहायक उपवनसंरक्षक, सावंतवाडी.

Web Title: Sindhudurg News Monkey fever issue