पिसाळलेल्या माकडाचा आयीत उच्छाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

दोडामार्ग - आयी कीटवाडीत पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला आहे. त्याने कुत्र्याचा चावा घेतला. तो कुत्राही पिसाळला आहे. शिवाय तो गावकऱ्यांच्या मागून धावत असल्याने गावकरी, शाळकरी मुले भयभीत झाले आहेत. दरम्यान येथून वनकर्मचारी गावात गेले होते. पण माकड उंचावर असल्याने त्याला पकडणे अशक्‍य असल्याचे सांगून वनविभागाने हात झटकले. 

आयी कीटवाडी येथे सध्या त्या एकट्या माकडाचेच वास्तव्य आहे. काही दिवसापूर्वी त्याने पाळीव कुत्र्याचा चावा घेतला होता. त्यानंतर तो कुत्राही पिसाळला. त्याच्यापासून माणसाला धोका पोचण्याची शक्‍यता निर्माण झाली. त्यामुळे नाईलाजाने त्याला मारुन टाकले. मात्र पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद मात्र सुरूच आहे. तो अचानक झाडावरून खाली उतरतो आणि बहुतेकवेळा महिलांचा पाठलाग करतो. त्या परिसरात शाळा आहे.

शाळेत जाणाऱ्या मुलांना धोका पोचू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाला त्याची कल्पना दिली. त्यानंतर दोन दिवसांनी वनकर्मचारी श्री. नाईक गावात गेले, पण त्याला पकडणे अशक्‍य असल्याचे सांगून बंदुकीच्या साह्याने त्याला ठार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गावकऱ्यांनी मात्र ते काम वनविभागानेच करावे असा आग्रह धरला आहे. या टोलवाटोलवीत माकड मात्र वाडीतच आहे आणि धोक्‍याची टांगती तलवार गावकऱ्यांच्या डोक्‍यावर कायम आहे.

माकडाला मारायचे कुणी?
माकडतापाने तालुक्‍यात पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात माकड मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. माकडतापाची लागण झाल्याने तो पिसाळला की अन्य कारणाने याची खात्री त्याच्या तपासणीनंतरच कळणार आहे. पण त्याला मारायचे कुणी हा प्रश्‍न आहे. गावकरी माकडाला हनुमानाचा अवतार मानतात. त्यामुळे कुणी पुढे येत नाही, अशी स्थिती आहे. मात्र आणखी संकटे गावकऱ्यांवर ओढवण्याआधी वनविभागाने ठोस पाऊ उचलण्याची गरज आहे.

Web Title: Sindhudurg News Monkey molestation in Aayi Kitwadi