सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २७०० कोटींचा निधी आणला - दीपक केसरकर

अमोल टेंबकर
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

आमदारांचे रिपोर्ट कार्ड

राज्यात फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पालकमंत्र्यांसह एक सत्ताधारी व एक विरोधी पक्षाचा आमदार आहे. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक व नीतेश राणे यांचा समावेश आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीविषयी घेतलेला हा आढावा...

सावंतवाडी मतदारसंघ - 

गेल्या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी २७०० कोटींहून अधिक निधी याठिकाणी आणल्याचा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला; मात्र प्रत्यक्षात विकासकामे कुठेच दिसत नाहीत, असे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव न करता शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने त्यांनी पुढील वाटचाल करण्याची भूमिका कित्येकदा मांडली आहे.

याठिकाणी गेली अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या लोकांकडून विकासाच्या गोष्टी सांगण्यात आल्या; मात्र प्रत्यक्ष शिवसेना भाजप युतीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला. तब्बल २७०० कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आणले पण त्याचे योग्य ते नियोजन करता आले नाही, असे बोलले जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि विशेषतः अनेक वर्षे डांबरीकरणापासून वंचित राहिले आहेत. रस्ते डांबरीकरणास प्राधान्य देणे 
गरजेचे आहे.

महिला आणि युवकांना रोजगार देण्याचा उद्देश आहे. त्यासाठी काथ्या प्रकल्पाबरोबर ‘होम स्टे’सारख्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण पर्यटनाला बळकटी देण्यात येणार असून ग्रामीण भागातील महीलांना रोजगार देण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी, महिलांना वाकून भात काढावे लागू नये, यासाठी यंत्राच्या माध्यमातून भात कापणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे श्री. केसरकर म्हणाले.

शिक्षण क्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने सावंतवाडीत सायन्स सेंटर उभारण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत ते सुरू होणार आहे. तसेच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जागासुद्धा बघण्याचे काम सुरू आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आपण विशेष लक्ष दिले आहे.

हा भाग डोंगराळ असल्यामुळे याठिकाणी वैद्यकीय अधिकारी राहण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी केली आहे. त्यातील काही पदे यापूर्वी भरली आहेत. यात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित असलेले प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. यात मळगाव टर्मिनसचे काम मार्गी लावण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे गेली अनेक वर्षे रखडलेले काम मार्गी लावण्यास केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहे. जिल्ह्यातील विमानतळ, सी वर्ल्ड यासारखे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.

जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मुख्य रस्ते मजबूत करण्याबरोबर आंबोली आणि गगनबावडा हे दोन्ही घाट रस्ते मजबूत करण्यात येणार आहे. आंबोलीतील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने साहसी खेळ सुरू करण्याबाबत विचार आहे. त्याच बरोबर फुलपाखरू पार्क विकसित करण्यात येणार आहे.

- आमदार दीपक केसरकर

निवडणुकीपुरतेच राजकारण 
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, ‘‘मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे जिल्ह्याचा मी विकास करू शकलो. जिल्ह्यात अनेक वर्षे असलेला राजकीय दहशतवाद मोडीत काढण्यासाठी लोकांनी मला सहकार्य केले. त्यामुळे मी कधीही राजकारण केले नाही. तळागाळातील माणसाचा विकास हाच केंद्रबिंदू मानला. फक्त निवडणुकीपुरतेच राजकारण केले आणि ग्रामपंचायतीसारख्या निवडणुकांत तर कधीही राजकारण केले नाही.’’

Web Title: Sindhudurg News MP Deepak Kesarkar Report card