रोजगार मेळाव्यांतून २५ हजारांवर नोकऱ्या - नीतेश राणे

रोजगार मेळाव्यांतून २५ हजारांवर नोकऱ्या - नीतेश राणे

कणकवली मतदारसंघ - 

राज्यात मोदी लाट असतानाही पंचवीस हजारांचे मताधिक्‍य घेऊन विजयी ठरलेल्या आमदार नीतेश राणे यांनी प्रचंड अपेक्षा निर्माण केल्या. मागील तीन वर्षांतील विविध आंदोलनांबरोबरच सेल्फी पॉइंट, नौकानयन, वॅक्‍स म्युझियम आदी उपक्रमांच्या माध्यमातून ते चर्चेत राहिले. तीन वर्षांत सहा कोटींचा संपूर्ण आमदार निधीही त्यांनी विकासकामांवर खर्च केला. राणेंच्या विविध कामांची, उपक्रमांची चर्चाही जोरदार झाली. पण हे उपक्रम फार काळ टिकवता आले नाही.

ऑक्‍टोबर २०११ मध्ये मुंबईत नीतेश राणे यांनी भव्य बेरोजगार मेळावा भरवला होता. यात शारीरिक व्यंग असलेल्यांसह २५ हजारांपेक्षा जास्त बेरोजगार युवकांना नोकऱ्या देण्यात आल्या. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डला या मेळाव्याची दखल घेणे भाग पडले. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातही तालुकानिहाय बेरोजगार मेळावे भरवून राणेंनी आपला दबदबा निर्माण केला. कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍याची स्वतंत्र ‘व्हिजन डॉक्‍युमेंटरी’ त्यांनी सादर केली. डॉक्‍टर, वकील, उद्योजक, कलावंत, सामाजिक संस्था आदी सर्वांचेच स्वतंत्र मेळावे घेऊन नीतेश राणेंनी अपेक्षा उंचावल्या.

आमदार झाल्यानंतर नीतेश राणे यांनी कणकवली, वैभववाडीत मोफत वाय-फाय सेवा सुरू केली. शहरात प्रथम मोफत वाय-फाय सुरू झाल्याने या उपक्रमाचे प्रचंड कौतुक देखील झाले; मात्र सहा महिन्यांनंतर वाय-फाय सेवेचा एकेक टॉवर बंद होऊ लागला. तो अद्याप सुरू झालेला नाही. यानंतर ग्रामीण भागात ‘औषध आपल्या दारी’ ही सेवा सुरू झाली. रात्री-अपरात्री केव्हाही गरज लागेल तेव्हा रुग्णांना आवश्‍यक ती सर्व औषधे घरपोच दिली जाणार होती; मात्र या सेवेचाही नंतर थांगपत्ता लागला नाही. कणकवली गडनदी पात्रात साहसी नौकानयनाचा प्रयोग देखील राणेंनी राबवला.

या उपक्रमाला जिल्ह्यातील पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी हा उपक्रम निश्‍चितच स्तुत्य होता. सेल्फी पॉइंट निर्माण करून आमदार राणेंनी वैभववाडीला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र देखभाल नसल्याने येथील सेल्फी पॉइंटच्या छत्र्या उलट्या झालेल्या आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी शहरात राणेंनी खिशातील पैसे खर्च करून सीसीटीव्ही बसविले; पण पोलिस यंत्रणा आणि सीसीटीव्ही देखभाल करणारी कंपनी यांच्यात समन्वय नसल्याने काही सीसीटीव्ही बंद दिसत आहेत.

देवगड शहरातील वॅक्‍स म्युझियमचा उपक्रम मात्र निश्‍चित कौतुकास्पद ठरला आहे. आत्तापर्यंत सुरक्षित बंदर आणि सुंदर किनारपट्टी अशी ख्याती असूनही देवगड शहर आणि कक्षेपासून दूर राहिले होते. तेथे वॅक्‍स म्युझियमची निर्मिती करून पर्यटनाच्या नकाशावर देवगडला एक स्थान मिळवून देण्यात नीतेश राणे यशस्वी ठरले आहेत. अनेक वर्षे मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाचा प्रश्‍न रखडला होता. यात समन्वयाने तोडगा काढण्यात आणि हा पुल खुला करण्यात नीतेश राणे यांनी मात्र मोठी भूमिका बजावली आहे. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा यासाठी देखील राणेंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पर्ससीन प्रश्‍नी त्यांनी केलेले ‘बांगडाफेक आंदोलन’ तर राज्यात गाजले.

कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन नगरपंचायती आमदार नीतेश राणेंच्या ताब्यात आल्या होत्या. मात्र या तीनही शहरात विकासाची पायाभूत कामे मार्गी लागलेली नाहीत. कणकवली शहरात भुयारी गटार योजनेचे घोंगडे भिजत राहिले. देवगड-जामसंडे नळपाणी योजना प्रश्‍न सुटलेला नाही. वैभववाडी बसस्थानकाच्या जागेचा प्रश्‍न सुटला असला तरी बसस्थानक निर्मितीबाबत अद्यापपर्यत तरी हालचाली झालेल्या नाहीत. 

२०१४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला जी आश्‍वासने दिली, ती पूर्ण करूनच आम्ही २०१९ च्या निवडणुकीला जाणार आहोत. पर्यटन हा केंद्रबिंदू ठेवून गेल्या तीन वर्षांत अनेक विकासाचे उपक्रम सुरू केले. तर पुढील दोन वर्षांत आणखी सुरू करीत आहोत. देवगड शहरात वॅक्‍स म्युझियमच्या निर्मितीबरोबरच येथील किनारपट्टीवर स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करण्याचे मिशन आहे. बंदर विकास, फळ प्रक्रिया निर्मिती, मालवण तालुक्‍यात फिल्मसिटी प्रकल्पही उभारला जात आहे. कणकवली, वैभववाडीत साहसी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण केल्या जाणार आहेत.
- नीतेश राणे, आमदार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com