तीन वर्षांत सत्तर कोटींची विकासकामे - वैभव नाईक

प्रशांत हिंदळेकर
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

आमदारांचे रिपोर्ट कार्ड

राज्यात फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पालकमंत्र्यांसह एक सत्ताधारी व एक विरोधी पक्षाचा आमदार आहे. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक व नीतेश राणे यांचा समावेश आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीविषयी घेतलेला हा आढावा...

कुडाळ-मालवण मतदारसंघ 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले. यानंतर त्यांनी गेल्या तीन वर्षांत सुमारे ७० कोटी रुपये खर्चाची विकासात्मक कामे मार्गी लावल्याचा त्यांनी दावा देखील केला आहे; मात्र पर्ससीन-पारंपरिक मच्छीमार वाद, कुडाळ भात गिरण, सीव्हीसीए, ग्रामीण भागातील रस्ते यांसारख्या प्रमुख समस्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे.

तीन वर्षांत मतदारसंघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते, ग्रामीण भागात आमदार निधी, बजेट तसेच २५-१५ मधून आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत मतदारसंघातील सुमारे ७० कोटी रुपयांची कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. याशिवाय माणगाव खोऱ्यात १०७ कोटीचे कोल्हापुरी बंधारे, किल्ले सिंधुदुर्ग विकास योजना, घोटगे-सोनवडे घाट रस्ता, मालवण बंदर जेटी सुशोभीकरण, मेढा-राजकोट येथे अद्ययावत जेटी, मालवण, पेंडूर, आचरा वीज उपकेंद्र, जलयुक्त शिवार योजनेसाठी आंजीवडे, पोखरण, कुसवे, पिंगुळी, गिरगाव, कुसगाव, नेरूर-हवेली, किर्लोस, असगणी, कुंभारमाठ, तिरवडे या गावांची निवड, ॲन्युइटी प्रोग्रॅमतंर्गत तळाशिल आचरा कणकवली रस्त्यास मंजुरी, देवबाग, मालवण-कसाल रस्त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे येत्या वर्षभरात मार्गी लागतील. 

येथील ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थान इमारतीचे कामे, आंबा, काजू बागायतदारांना हमीपत्रावर नुकसानभरपाई थेट खात्यात जमा व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. गेली अनेक वर्षे पारंपरिक, पर्ससीनधारक यांच्यात संघर्ष होत असून यावर विधानसभेत आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कायदा करत पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून दिला आहे. मतदारसंघातील ३० टक्के शाळा डिजिटल बनविण्यात आल्या आहेत. वाचनालयांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शैक्षणिक उपक्रमांमध्ये मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घडविण्याबरोबरच मंत्रालयीन कामकाज कसे चालते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केला आहे. 

मालवणातील भुयारी गटार योजनेचा रखडलेला निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच येथील नागरिकांना भेडसावणारा सीव्हीसीएच्या प्रश्‍नाबाबतही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. येत्या दोन वर्षात मतदार संघातील उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याबरोबरच ग्रामीण भागात पर्यटन कसे वाढेल. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे. असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

आमदार वैभव नाईक यांनी तीन वर्षात भुयारी गटार योजनेसाठीचा उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. सीव्हीसीएच्या प्रश्‍नाबाबतही त्यांनी सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. मतदारसंघात कोणतीही घटना घडल्यावर त्याठिकाणी आमदार पोचतात. प्रसंगी आवश्‍यक ते सहकार्य करतात. सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क आहे. आमदार नाईक यांनी मालवण-कसाल, मालवण-कुडाळ या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्राधान्याने लक्ष पुरविणे आवश्‍यक बनले आहे. सीव्हीसीएच्या प्रश्‍नाबाबत पुढील कार्यवाही विनाविलंब कशी होईल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत. शहर विकास आराखड्याची समस्या दूर करावी. पर्यटन वाढत असताना जलक्रीडा व्यावसायिकांमधील वाद तसेच अन्य समस्या दूर करण्यासाठी पर्यटनाचे निश्‍चित धोरण ठरविताना नियमन, सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
- लक्ष्मीकांत खोबरेकर, नागरिक

Web Title: Sindhudurg News MP Vaibhav Naik Report card