मुंबई-गोवा महामार्ग हद्द निश्‍चितीचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कणकवली - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम नोव्हेंबर अखेरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने महामार्ग दुतर्फा हद्द निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. पाऊस संपताच महामार्ग हद्दीतील वृक्ष तोड आणि सफाईची कामे सुरू होणार आहेत.

कणकवली - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम नोव्हेंबर अखेरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने महामार्ग दुतर्फा हद्द निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. पाऊस संपताच महामार्ग हद्दीतील वृक्ष तोड आणि सफाईची कामे सुरू होणार आहेत. 

दरम्यान कणकवली, वागदे, कसाल, ओरोस ही गावे वगळता मोबदला वितरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकांमुळे मोबदला वितरणाचे काम काही दिवस थांबले होते. उद्या (ता. १७) मतमोजणी आटोपताच पुन्हा मोबदला वितरणाची कार्यवाही सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व गावांचा मोबदला वितरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर नोव्हेंबर अखेरीस प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठीची जय्यत तयारी ठेका घेतलेल्या कंपनीने सुरू केली 
आहे.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत असलेल्या जिल्ह्यातील ६० टक्‍के खातेदारांना मोबदला वितरणाचे काम पूर्ण झाले आहे. हरकती,  आक्षेप यामुळे काही खातेदारांचे काम थांबले आहे. सध्या कणकवली शहरातील खातेदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून पुढील आठवड्यापासून मोबदला वितरण सुरू होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील खारेपाटण ते कलमठ हा टप्पा हरियाना येथील केसीसी बिल्डकॉन या कंपनीकडे तर कणकवली ते झाराप हा टप्पा भोपाळ दिलीप बिल्डकॉन कंपनीकडे हस्तांतरण करण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. याखेरीज महामार्ग दुतर्फा येणाऱ्या जमिनीची अंतिम हद्द निश्‍चिती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा हद्द निश्‍चितीचे खांब रोवले जात आहेत.

दरम्यान चौपदरीकरणात येणारे महावितरणचे विद्युत पोल, वीज वाहिन्या, पाणी पुरवठा योजना स्थलांतरित करण्याचे काम तसेच छोटे, मोठे पूल आदींची कामे संबंधित कंपन्यांकडेच सोपविण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने वृक्षतोड परवानगी, महावितरण आणि नळयोजनांची पाइपलाइन आदींसाठीच्या परवानग्या व इतर आनुषंगिक कामे या कंपन्यांकडून केली जात आहेत.

Web Title: Sindhudurg News Mumbai-Goa Highway boundary marking work starts