मुंबई-गोवा महामार्गाचा दर्जा वादात 

नांदगाव - येथील नवा राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी खचत असल्याने त्या ठिकाणी सिमेंटची मलमपट्टी केली जात आहे.
नांदगाव - येथील नवा राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी खचत असल्याने त्या ठिकाणी सिमेंटची मलमपट्टी केली जात आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर यंदा प्रथमच नव्या सिमेंटच्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली. विनाखड्डे आणि आरामदायी असणाऱ्या या रस्त्याबाबत वाहनचालकांमध्ये सुरवातीला अप्रूप आणि समाधान होते. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या महामार्गाचा दर्जा उघड झाला आहे. नव्या मार्गाखालील माती दबत असल्याने सिमेंटचा नवा मार्ग देखील खचू लागला आहे. हुंबरट ते कासार्डे दरम्यान सुमारे पंधरा ठिकाणी महामार्ग दबला गेल्याचे दिसून आले आहे.

ज्या ठिकाणी महामार्ग खचला जात आहे, तेथे सिमेंट टाकून नवा महामार्ग पूर्ववत करण्याची कार्यवाही ठेकेदाराकडून केली जात आहे. पण ही तात्पुरती मलमपट्टी पुढील काळात वाहन चालकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे. उन्हाळ्यात नवा मार्ग तयार करताना येथील मुरूमाच्या मातीवरच सिमेंटचा थर टाकून नवा रस्ता तयार केला.

आता या सिमेंटच्या रस्त्याखालील माती वाहून जात आहे. त्यामुळे नवा रस्ताही खचत आहे. सिंधुदुर्गात कोकण रेल्वे मार्गाची उभारणी होत असताना मातीचा प्रत्येक थर झाल्यानंतर त्यावर पाणी मारून रोलर फिरवला जात असे. मात्र मुंबई गोवा महामार्ग तयार करत असताना तशी कार्यवाही झाली नसल्याने हा रस्ता खचत असल्याचे ठिकठिकाणच्या नागरिकांकडून सांगितले जात आहे. 

दर्जा राखणे महत्त्वाचे 
मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या हद्दीत मागील तीन वर्षात 117 अपघात झाले आहेत. यात 287 जण जखमी तर 50 व्यक्‍तींना जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील अपघात होऊ नयेत यासाठी चौपदरीकरण केले जातेय. मात्र चौपदरीकरणाचा दर्जाच खराब असेल तर अपघातांचे सत्र सुरूच राहील अशीही भीती प्रवाशांतून व्यक्‍त केली जात आहे. 

अडलेले पाणी धोकादायक 
मुंबई गोवा महामार्गाचे काम तयार करताना अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत अडले गेले आहेत. तेथील पाण्याचा निचरा न झाल्यास अनेक ठिकाणी तेथील महामार्गाचा भाग वाहून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशा काही ठिकाणी नवीन मोऱ्या घालून मार्ग सुरळीत ठेवला जात आहे. झाराप ते खारेपाटण दरम्यान दोन ठेकेदार कंपन्यांकडून महामार्ग सुरक्षिततेसाठी 24 तास गस्त घातली जात आहे. याखेरीज महामार्गावरील कमकुवत पुलांच्या ठिकाणी देखील 24 तास माणसे तैनात केली आहेत. 

अतिवृष्टी कालावधीत महामार्गाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी यासाठी महामार्ग ठेकेदाराने रस्ता कामाचा विमा काढला. त्यानुसार खराब झालेल्या रस्त्याच्या कामापोटी 98 लाख रुपयांचा विमा ठेकेदाराला मिळणार आहे. पण पुढील कालावधीत या खराब रस्त्यामुळे अनेक प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागणार आहे. तसे झाल्यास ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हायला हवी. 
- परशुराम उपरकर,
सरचिटणीस मनसे 
 
यंदाच्या पावसाळ्यात नव्या महामार्गाची काही ठिकाणी वाताहत झाली असली तरी महामार्गाच्या दुरुस्तीची पुढील दहा वर्षाची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यामुळे खराब झालेला महामार्ग ठेकेदारालाच दुरुस्त करून द्यावा लागेल. तसेच नवा महामार्ग चांगल्या दर्जाचाच राहील याबाबतच्या सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. 
- प्रमोद जठार,
भाजप जिल्हाध्यक्ष 

2019 पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याची ग्वाही सरकारकडून दिली जातेय. त्यासाठी ठेकेदारांवर दबाव आणला जातोय. अवघ्या दीड वर्षात महामार्ग पूर्ण करण्याची घाई केली जात असल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचा दर्जा ढासळला आहे. त्यामुळे हा मार्ग किती वर्षे टिकेल याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. 
- सुनील वारंग,
वाहनचालक 

यंदा उच्चांकी पाऊस झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील नवा सिमेंटचा रस्ता देखील काही ठिकाणी खचला आहे. त्याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. सप्टेंबर नंतर खचलेला मार्ग पूर्णतः तोडून तेथे नवीन सिमेंटचा रस्ता तयार केला जाणार आहे. पुढील पंधरा वर्षे याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे असेल. 
- प्रकाश बनगोसावी,
कार्यकारी अभियंता, महामार्ग प्राधिकरण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com