देवगडात नाईकांची राणेंवर टीका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

देवगड - अरबी समुद्रात तयार झालेले ‘ओखी’ वादळ शमण्याची शक्‍यता वाटत असतानाच आता येथे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समुद्री वादळाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

देवगड - अरबी समुद्रात तयार झालेले ‘ओखी’ वादळ शमण्याची शक्‍यता वाटत असतानाच आता येथे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समुद्री वादळाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला. त्यामुळे राजकीय वादळाची ठिणगी पडली आहे. 

येथील बंदराची पाहणी करून मच्छिमारांशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यानिमित्ताने शिवसेना आमदार वैभव नाईक येथे आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्थानिक आमदारांवर टीका केली. 

या वेळी नाईक म्हणाले, ‘‘एरव्ही विकासाच्या किंवा अन्य विषयावर राजकीय आरोप करणारे स्थानिक आमदार नीतेश राणे किनारपट्टीवर वादळसदृश्‍य स्थिती निर्माण झाली असताना कुठे दडी मारून बसले आहेत. समुद्रात वादळसदृश्‍यस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांसमोर संकट उभे राहिले. त्यांना मदतीची खरी गरज होती. वादळामुळे बाहेरील मच्छीमारांबरोबरच किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांवर प्रसंग उद्‌भवलेला असताना राणे मात्र येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे मच्छीमारांबाबत त्यांना किती कळवळा आहे याचे उत्तर आता येणाऱ्या निवडणूकीतच मच्छीमार त्यांना देतील.’’
याची कुणकुण येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांना लागताच त्यांनी पलटवार केला.

चांदोस्कर म्हणाले, ‘‘वादळसदृश्‍यस्थिती निर्माण झाल्यामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमध्ये मच्छीमारांना मदत करण्याची आमदार नीतेश राणे यांनी प्रशासनाला दुरध्वनीवरून सुचना केली. कार्यकर्ते म्हणून त्यांनी आम्हाला आदेश दिल्यानुसार आवश्‍यक ती मदत मच्छीमारांपर्यंत पोचवली. नगरपंचायत आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याने त्यांच्या सुचनेनुसार पाण्याची व्यवस्था केली. वादळात स्थानिक मच्छीमारांचे नुकसान झालेले नाही. वादळसदृश्‍यस्थितीमध्ये आमदारांचे कार्यकर्ते येथे राबत होते. मात्र, आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री दीपक केसरकर आता ट्रॉलरना झेंडा दाखवायला आले. त्यांनी वेंगुर्ले, मालवणमधील नुकसानग्रस्त मच्छीमारांना मदत मिळवून द्यावी.’’

यावेळी उमेश कणेरकर, बापू जुवाटकर, प्रणाली माने, शरद ठुकरूल आदी उपस्थित होते. त्यामुळे आता राजकीय वादळाला सुरूवात होण्याची शक्‍यता दिसते.

Web Title: Sindhudurg News Naik comment on Rane in Devgad