नापणेला चक्रीवादळाचा तडाखा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

वैभववाडी - जिल्ह्यात आजही पावसाने धडाक्‍यात हजेरी लावली. गडगडाटासह मुसळधार पावसाने आज जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपले. यामध्ये नापणे आणि तिथवली या दोन गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला.

मुसळधार पाऊस, सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान 

वैभववाडी - जिल्ह्यात आजही पावसाने धडाक्‍यात हजेरी लावली. गडगडाटासह मुसळधार पावसाने आज जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपले. यामध्ये नापणे आणि तिथवली या दोन गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. नापणे गावात झाडे कोसळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. तिथवली गावात विजेचे खांब आणि विजवाहिन्या तुटल्यामुळे संपूर्ण तालुका अंधारात आहे. 

नापणेत आज सायकांळी चारच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळामुळे गावातील अनेक झाडे उन्मळून पडली. यापैकी अनेक झाडे, मंदिर, घरे आणि गोठ्यांवर पडली. नापणेतील भवानी मंदिरावर झाड कोसळल्यामुळे मंदिराच्या कळसाचे नुकसान झाले. याशिवाय मंदिरांच्या इतर भागाची देखील पडझड झाली आहे. प्रकाश जैतापकर, यशवंत जैतापकर, जयवंत जैतापकर, हरिश्‍चंद्र जैतापकर, पाडुरंग जैतापकर यांच्या घरांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले. काहीच्या घरांची पडवी तर काहींच्या इमारतींचा मध्यभाग कोसळला. गावात अनेक ठिकाणी पडझड झाली. गावातील अनेक वीज खांब उन्मळून पडले आहेत; तर वीज वाहिन्यादेखील कोसळल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा बंद झाला आहे. नापणेत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. 
नापणेप्रमाणे तिथवली आणि दिगशीत देखील नुकसान झाले आहे. तिथवली येथील सुभाष शिंदे यांच्या घरावर झाड कोसळल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे. तर दिगशी येथील स्वप्नील धुरी यांच्या पोल्ट्री फार्मवर झाड कोसळल्यामुळे नुकसान झाले आहे. नाधवडे हेळकरवाडी येथील वनिता गुंदये आणि भागीरथी परबत यांच्या घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले. 

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तालुक्‍यात आज सायकांळी साडेतीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड तास मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाने अक्षरश: झोडपून काढले. वादळामुळे तळेरे मार्गावरील नाधवडे व कोकिसरे येथे रस्त्यावर अनेक झाडे कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. पाऊस ओसरल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी झाडांच्या एका बाजूच्या फांद्या छाटून वाहनचालकांना एकेरी वाहतूक सुरू करून दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन आले. रस्त्यावर असलेली अनेक झाडे जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्‍यात सायंकाळच्या वेळेत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे शेतीवरील संकट टळले आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. 

सावंतवाडीत जोर"धार' 
सावंतवाडी शहरातील नागरिकांनी आज ढगफुटीचा अनुभव घेतला. शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार झाले होते. दुपारी तालुक्‍यात अनेक ठिकाणी पावसाचा शिडकाव सुरू होता. दरम्यान काही वेळाने अचानक मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. येथील शहरासह जिल्ह्यात वैभववाडी, कणकवलीचा काही भाग, कुडाळ, देवगडचा काही भाग, वेंगर्ले, मालवण अशा विविध भागात पाऊस काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी दमदार स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसाने सायंकाळनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले होते. गटारे पाण्याने भरली गेली होती. बऱ्याच भागात पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली होती. शहरात सालईवाडा, सबनीसवाडा, बाहेरचा वाडा, वैश्‍यवाडा परिसरातील गटारे पाण्याने तुंबली होती. ग्रामीण भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. रविवार असल्याने वाहतूक व जनजीवनावर फारसा परिणाम जाणवला नसला तरी या पावसाने बराच भाग प्रभावित झाला आहे. 

कणकवलीत पाऊसधारा 
कणकवली तालुक्‍यात आजही पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मेघर्गजनेला सुरुवात झाली. कमालीचा काळोख दाटून पावसाच्या धारा कोसळल्या. दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वीज आणि दूरध्वनी सेवा खंडित झाली होती. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे वीज आणि दूरध्वनी सेवा सुरू झाली. परतीच्या पावसाचे हे संकेत असल्याचे मानले जात आहे. सध्या हळवी भात शेती तयार झाली असून काही भात लावणीची रोपे फुलोऱ्यावर आली आहेत. त्यातच हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. परतीचा पाऊस, त्यातच उत्तरा नक्षत्र सुरू झाल्याने शेतातील मासे उतरणीला लगले आहेत. त्यामुळे डोमे, आके, पाग, सेलूक घेऊन मासे मारणाऱ्या खवय्यांना चांगले दिवस आले आहेत. 
 

Web Title: Sindhudurg news Napane heavy rain