स्वाभिमान तर्फे 13 ऑगस्टला सिंधुदुर्ग, रत्नागिरीत चक्काजाम

तुषार सावंत 
रविवार, 22 जुलै 2018

11 ऑगस्टपर्यंत रस्ता दुरूस्त न झाल्यास 13 ऑगस्टला स्वाभिमान पक्ष सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकाच वेळी चक्का जाम करेल असे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून जाहीर केले. 

कणकवली - गेल्या चार वर्षात उद्योग आणण्याची घोषणा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांचे राजकीय वजन नाही आणि विकास करण्याची कुवतही नाही. त्यामुळे जिल्हा दहा वर्षे मागे गेला. पाटबंधारे, आरोग्य आणि रस्त्यासाठी निधी नाही. चौपदरीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. यामुळे अनेकजणांचे जीव गेले. काही लोक जखमी होत आहेत. त्यामुळे 11 ऑगस्टपर्यंत रस्ता दुरूस्त न झाल्यास 13 ऑगस्टला स्वाभिमान पक्ष सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकाच वेळी चक्का जाम करेल असे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून जाहीर केले. 

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गाचे काम सुरू असताना वाहतुक व्यवस्था सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. पण या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत आहे, असे राणे म्हणाले. अपघाताच्या घटनांना जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत रस्ता सुस्थितीत न झाल्यास एकाच वेळी दोन्ही जिल्ह्यात 13 ऑगस्टला चक्का जाम आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. 

ते म्हणाले, ""महामार्गाबरोबरच जिल्ह्यातील अन्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पालकमंत्र्यांना हे रस्ते दिसत नाहीत कारण ते सावंतवाडी सोडून कुठेही दिसत नाहीत. पाटबंधारे, रस्त्याला पैसे नाहीत. आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे. असलेली यंत्रणा बंद असून औषधालाही पैसा नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सुपर हॉस्पीटल बांधण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा ते बांधण्यापूर्वी असलेल्या आरोग्याच्या सुविधा चांगल्याप्रकारे देण्याची धमक दाखवावी.

जिल्हा परिषदेने 48 कोटीचे रस्त्याचे प्रस्ताव पाठविले. शासनाकडून केवळ तीन कोटी मंजुर झाले. गेल्या चार वर्षापूर्वी रस्त्याची काय स्थिती होती आता काय आहे. प्रत्येक तलाठी कार्यालयातील स्थिती जनतेला लुबाडण्यासारखी आहे, असेही राणे म्हणाले 

ते म्हणाले, ""पालकमंत्र्यांनी वापोली येथे 2200 कोटीचा डेटा सेंटरचे भूमीपूजन केले. या सेंटरला उद्योग विभागाची परवानगी आहे काय, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती काय, हे सेंटर खाजगी आहे की शासकीय आहे याबाबत कोणतीही माहिती नाही. या उद्योगाची शाश्‍वती कोण देणार.

पालकमंत्री फसवणूक करीत आहेत. आतापर्यंत सांगितलेला एकही कारखाना आलेला नाही. फार मोठा गवगवा करून भातगिरण सुरू केली पण जिल्ह्यातील एकही क्विंटल भातावर या गिरणीत प्रक्रीया झाली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, सुदन बांदीवडेकर आदी उपस्थित होते. 

Web Title: sindhudurg news Naraya Rane Press