शिवसेनेची डोकेदुखी वाढली

शिवप्रसाद देसाई
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश न करता वेगळा पक्ष काढल्याने कोकणात शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाला; मात्र ते ‘एनडीए’त सामील झाल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी कायम आहे. येत्या काळात राणे शिवसेनेच्या संघटनेला धक्का देण्याची रणनीती आखणार आणि भाजपकडून तशी अपेक्षा असणार, हे आता जवळपास उघड झाले आहे.

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश न करता वेगळा पक्ष काढल्याने कोकणात शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाला; मात्र ते ‘एनडीए’त सामील झाल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी कायम आहे. येत्या काळात राणे शिवसेनेच्या संघटनेला धक्का देण्याची रणनीती आखणार आणि भाजपकडून तशी अपेक्षा असणार, हे आता जवळपास उघड झाले आहे.

राणेंना भाजपकडून मैत्रीचा हात पुढे होणार हे गेल्या काही महिन्यांत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे स्पष्ट झाले होते. शिवसेना आणि राणेंसाठी आजही राजकीय शत्रूत्व पूर्वीइतकेच ताजे आहे. पूर्ण राज्याचा विचार करता शिवसेनेसाठी सगळ्यात चांगली आणि सुरक्षित राजकीय स्थिती कोकणात आहे. शिवाय कोकण आणि मुंबई यांचे नाते मुंबईतल्या राजकारणावरही प्रभाव टाकते. राणे शिवसेनेत असताना ही ताकद उभी करण्यात त्यांचाही महत्त्वाचा वाटा होता. यामुळे राणेंना शिवसेनेच्या या बळाची पाळेमुळे पूर्णतः माहित आहेत.

राणे थेट भाजपमध्ये गेले असते तर शिवसेनेतील नाराज गट आपल्याकडे ओढण्यात त्यांना यश येण्याची शक्‍यता होती. तसे झाले असते तर येत्या काळात येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्‍यता होती. याचा परिणाम मुंबईतही दिसण्याची शक्‍यता नाकारता येणार नव्हती; मात्र भाजपमध्ये राणेंनी थेट प्रवेश न केल्यामुळे शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाला.

असे असले तरी भाजप आणि राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची मैत्री आता अधिकृत झाली आहे. राणेंच्या एनडीएमधील प्रवेशाने शिवसेनेची डोकेदुखी कायम राहणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोकणात राणेंचा पक्ष आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला गेल्यास आणि शिवसेना विरोधात उभी असल्यास काही मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्‍यता आहे.

विशेषतः सिंधुदुर्गात शिवसेनेसाठी अधिक अडचणी निर्माण होणार आहेत. कारण आजही राणेंकडे ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मोठे बळ आहे. सत्ताधारी असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढण्याबरोबरच काही नाराज गट त्यांच्याकडे आकर्षिले जाण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी अदृश्‍य रुपाने जवळपास सगळीकडे वावरत आहे. या कमजोर बाजू राणे आणि त्यांच्या समर्थकांना पुरेपुर माहिती आहेत. त्यामुळे आगामी मोठ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी केवळ भावनिक आवाहनावर निवडणुका जिंकणे कठीण बनणार आहे.

नवे समीकरण...
राणेंनी पक्ष स्थापनेच्या पत्रकार परिषदेवेळीच शिवसेनेवर टीका करून आपला इरादा स्पष्ट केला आहे. दुसरीकडे राणेंशी मैत्री करण्यामागे शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा हेतू लपून राहिलेला नाही. यामुळे कोकणातील पुढचे राजकारण शिवसेना भाजप व्हाया नारायण राणे असे रंगणार आहे.

Web Title: sindhudurg news Narayan Rane new party headache for Shivsena