नाना, भाईंचा जमाना इतिहासजमा

शिवप्रसाद देसाई
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

राजकारणातले राणे...
सावंतवाडी -  नारायण राणेंच्या आगमनाने सिंधुदुर्गातील राजकारणाचे रूपच पालटले. नाना, भाई यांचा जमाना इतिहासजमा झाला. दादांचे युग सुरू झाले.

सावंतवाडी -  नारायण राणेंच्या आगमनाने सिंधुदुर्गातील राजकारणाचे रूपच पालटले. नाना, भाई यांचा जमाना इतिहासजमा झाला. दादांचे युग सुरू झाले.

राणेंच्या आगमनावेळी केवळ सिंधुदुर्गच नाही तर पूर्ण कोकणात राजकीय वातावरण टिपीकल पद्धतीचे असायचे. साधे खादीचे कपडे घालणाऱ्या नेत्यांभोवती त्याच त्या कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. समाजवादी सर्रास खादींच्या पेहरावातच दिसायचे. काँग्रेसचे नेते साध्या कपड्यांसह पांढऱ्याशुभ्र वेशभूषेत लोकांमध्ये मिसळायचे.

निवडणुकांव्यतिरिक्त राजकारण फारसे सक्रिय नसायचे. राजकीय पटलावर शक्‍यतो ज्येष्ठ नेत्यांचाच वावर असायचा. इतकेच काय तर नेत्यांना आदराने नाना, भाई अशा नावाने संबोधले जायचे. माजी केंद्रीयमंत्री मधु दंडवते, आमदार पुष्पसेन सावंत हे त्या काळातील समाजवादी नेते नाना या नावाने लोकप्रिय होते. भाईसाहेब सावंत, नंतरच्या काळातील सुरेश दळवी, दीपक केसरकर, प्रवीण भोसले हे काँग्रेसचे नेते भाई म्हणून कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते.

राणेंची जिल्ह्यातल्या राजकारणातील एन्ट्री या सगळ्या चित्राच्या पलीकडची होती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ अशी ओळख निर्माण केली. या नावाभोवती कार्यकर्त्यांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण झाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर राणेंचा जिल्ह्यात होणारा दौरा या आधीच्या नेत्यांपेक्षा वेगळा असायचा. मागे आणि पुढे गाड्यांचा ताफा असायचा. पोलिसांची सायरन वाजविणारी गाडी पुढे चालत असे.

गावोगाव रस्त्यावरचा धुरळा उडवत गाड्यांचा ताफा दाखल होत असे. त्यात राणेंची गाडी सहज ओळखता येईल अशी असायची. ताफा दाखल होताच राणेंची कार्यक्रमस्थळी होणारी एन्ट्री विशेष लक्षवेधी असायची. त्यांची चालण्याची ढब, बोलण्याची स्टाईल, पेहराव हे सगळे कार्यकर्त्यांसाठी स्वप्नवत वाटत असे. त्यांनी ही स्टाईल कायम जपली. मागे स्टेनगन घेतलेले पोलिस, ताफ्यात पोलिसांच्या गाड्या, मागे-पुढे कार्यकर्त्यांचा वावर या गोष्टी राणेंच्या राजकीय चढत्या आलेखाबरोबरच अधिक व्यापक होत गेले.

या आधीच्या नेत्यांची भाषणे विकास, राष्ट्रीय प्रश्‍न याला वाहिलेली असायची. राणेंनी भावनिक राजकारणाची सिंधुदुर्गात खऱ्या अर्थाने सुरवात केली. तरुणांच्या मनामधील प्रश्‍नाला वाचा फोडली. त्यांची बोलण्याची ढबही आक्रमक. त्यांचे काही शब्द उच्चारण्याची पद्धत पुढच्या काळात त्यांची स्टाईल बनली. एकूणच त्यांनी सिंधुदुर्गातील राजकारणाचा माहोलच बदलून टाकला. हळूहळू सिंधुदुर्गाला या स्टाईलची सवय झाली. याच्या जोडीने राणेंचे राजकीय वजन वाढत गेले.

सिंधुदुर्गाशी ‘कनेक्‍ट’...
राणेंनी सिंधुदुर्गाच्या पालकमंत्रीपदाची धुरा दिर्घकाळ सांभाळली. मुंबईतला नेता कोकणाला किती वेळ देणार हा मुद्दा असायचा. राणेंनी तो खोडून काढला. मंत्री, पालकमंत्री असताना महिन्यातून किमान एकदा ते सिंधुदुर्गात यायचे. जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख गोष्टींवर त्यांचे नियंत्रण होते. राणेंचा हा दौरा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरायचा. जसे मुंबईत मातोश्रीला स्थान तसे सिंधुदुर्गात कणकवलीतील राणेंच्या ओमगणेश या निवासस्थानाला महत्व प्राप्त झाले.
 

Web Title: sindhudurg news Narayan Rane political journey