राष्ट्रवादीने स्वाभिमानला गृहीत धरू नये - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

रत्नागिरी - नांदेडमध्ये अजित पवार यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्यांच्या वाट्टेल तशा वागण्याला आळा घालण्यासाठी आमच्या ताकदीची जाणीव वेळीच करून दिली जाईल. त्यांनी स्वाभिमान पक्षाला गृहीत धरू नये, असा इशारा सरचिटणीस नीलेश राणेंनी पत्रकार परिषदेत दिला.

रत्नागिरी - नांदेडमध्ये अजित पवार यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्यांच्या वाट्टेल तशा वागण्याला आळा घालण्यासाठी आमच्या ताकदीची जाणीव वेळीच करून दिली जाईल. त्यांनी स्वाभिमान पक्षाला गृहीत धरू नये, असा इशारा सरचिटणीस नीलेश राणेंनी पत्रकार परिषदेत दिला.

ते म्‍हणाले, ‘‘कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीबाबत निश्‍चित काहीच नाही. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्या मुलाला उमेदवारी निश्‍चित झाली आहे. या निवडणुकीत सिंधुदुर्गातील ८० मते निर्णायक आहेत. या वेळी राष्ट्रवादीने स्वाभिमानला गृहीत धरू नये. अजित पवार राणेंवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत. त्याची जाणीव त्यांना करून देणार आहे. या भावना नारायण राणेंपर्यंत पोचविणार आहे.’’ 

नीलेश राणे म्हणाले, ‘‘कोकणात राष्ट्रवादीला नारायण राणे यांनी सांभाळले. मात्र, त्याची जाण न ठेवता नांदेडच्या सभेत अजित पवार यांनी राणेंविरोधात वक्तव्य केले. मागील लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीने मदत केली नाही.’’

ते म्‍हणाले, ‘‘कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक २१ मे रोजी होत असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. गतवेळी राष्ट्रवादीचे अनिल तटकरे यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंना फोन करून मदत करण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने राणेंचा मुलगा असतानाही मदत केली नाही. राणे यांनी सहकार्याचीच भूमिका घेतली, तरीही अजित पवार यांनी राणेंवर टीका केली.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Nilesh Rane comment