शिवसेनेमुळे कोकणात विनाशकारी प्रकल्प - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

देवगड - केंद्र आणि राज्यातील उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्या माध्यमातून विनाशकारी प्रकल्प कोकणवर लादून शिवसेना पुढील पिढी उद्‌ध्वस्त करण्याचे काम करत आहे. शिवसेना कोकण विकायला निघाली असल्याची खरमरीत टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी गिर्ये (ता. देवगड) येथील जाहीर सभेत केली.

देवगड - केंद्र आणि राज्यातील उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्या माध्यमातून विनाशकारी प्रकल्प कोकणवर लादून शिवसेना पुढील पिढी उद्‌ध्वस्त करण्याचे काम करत आहे. शिवसेना कोकण विकायला निघाली असल्याची खरमरीत टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी गिर्ये (ता. देवगड) येथील जाहीर सभेत केली. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाही लक्ष्य करीत रिफायनरी प्रकल्प येथे होऊ देणार नसल्याचे ठणकावले.  

तालुक्‍यातील गिर्ये, रामेश्‍वर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरीविरोधात गिर्ये येथे जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार नितेश राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, बाळ खडपे, प्रणीता पाताडे, प्रकाश राणे, अमोल तेली, संदीप साटम, रणजित देसाई, मिलिंद कुळकर्णी, प्रियांका साळसकर, रवींद्र नांग्रेकर, ओंकार देसाई आदी होते. 

नीलेश राणे म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यातील उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. रत्नागिरीसह खासदार, आमदार शिवसेनेचे असूनही प्रकल्प रद्द करण्याची त्यांच्यामध्ये धमक नाही. शिवसेनेकडे कसलीही नीतिमत्ता नसून कोकणचे वाळवंट करायला निघाले आहेत. प्रकल्पाला विरोध करायचा, जमिनींच्या माध्यमातून दलाली मिळवायची आणि मग त्याचे पाप राणेंच्या माथी मारायचे. शिवसेना स्थानिकांना कसलाही रोजगार देणारे प्रकल्प आणणार नाही. जनतेला नको असलेला प्रकल्प रद्द करण्याची त्यांची हिंमत नाही. नारायण राणे यांनी मुलांपेक्षाही कोकणवर अधिक प्रेम केले. कोकणच्या विकासाचे त्यांना वेड आहे. जनतेच्या समाधानात आपले समाधान मानणारा येथील आमदार असून, तो स्थानिकांच्या पाठीशी आहे. कोकणकडे वाकड्या नजरेने पहाणाऱ्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी एकसंध राहून विरोध कायम राखावा.’’ 

नितेश राणे म्हणाले, ‘‘कोकणचे निसर्गसौंदर्य बिघडवू पाहणारे कोणी प्रदूषणकारी प्रकल्प आणीत असतील, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. कोकणामुळे अस्तित्व निर्माण झालेली शिवसेना कोकण संपवायला निघाली. शिवसेना जनतेला खुळे बनवतेय. वेळकाढूपणातून प्रकल्पग्रस्तांचा विरोध मावळण्याची ते वाट पाहतायत. एका बाजूला प्रकल्प रद्दची भाषा करायची तर दुसरीकडे प्रशासकीय कामकाज सुरू ठेवायचे. यातून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना करीत आहे. कोकणवर प्रेम, जनतेशी प्रामाणिकपणा मनातून लागतो. कोकणचे भवितव्य घडवायचे असेल तर नारायण राणेच हवेत. कोकणी माणसाची अस्मिता टिकवण्याचे काम स्वाभिमानी पक्षात होत आहे.’’ त्यांनीही शिवसेना व पक्षप्रमुखांसह खासदारांवर टीका केली. मिलिंद कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अमोल तेली यांनी आभार मानले.

पाठिंबा काढण्याची उडविली खिल्ली
रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची सत्तेतील शिवसेनेची खरंच इच्छा असेल, तर त्यांनी ते करावे, असे नितेश राणे यांनी सांगत शिवसेनेतर्फे राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची खिल्ली उडवली. प्रकल्प रद्द करू म्हणणाऱ्या शिवसेनेचे उद्योगमंत्री विधिमंडळामध्ये गप्प का बसतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Sindhudurg News Nilesh Rane comment